ऑनलाइन जुगाराची जाहिरात; अभिनेत्यांवर गुन्हा दाखल करा; आ. परिणय फुके यांची विधान परिषदेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:12 IST2025-03-22T14:10:37+5:302025-03-22T14:12:00+5:30
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार लाखो रुपये घेऊन अशा जाहिराती करत आहेत.

ऑनलाइन जुगाराची जाहिरात; अभिनेत्यांवर गुन्हा दाखल करा; आ. परिणय फुके यांची विधान परिषदेत मागणी
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन जुगार खेळण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले जात आहे. बॉलिवूडमधील काही अभिनेते या जुगाराच्या जाहिराती करत आहेत. त्यामुळे अशा सर्व अभिनेत्यांविरोधात प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपा आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार लाखो रुपये घेऊन अशा जाहिराती करत आहेत. त्या जाहिरातीला बळी पडून अनेक लोक ऑनलाईन जुगार खेळत आहेत. या जुगाराचा आतापर्यंत अनेकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे अशा ऑनलाइन ॲपवर बंदी घालण्याची गरज असून, ॲप चालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, असे त्यांनी सांगितले.
ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. हा पैसा येतो कुठून आणि जातो कुठे? याची चौकशी होणे गरजेचे आहे. या पैशाचा वापर चुकीच्या कामांसाठी होऊ शकतो. सरकारने तातडीने याबाबत कायदा करून तत्काळ गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करावी. यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील, असे आ. फुके म्हणाले.