दहावीचा निकाल लागल्यानंतर पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू होते. आपल्या मुलांना चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता यावा म्हणून सगळेच पालक प्रयत्नशील असतात. आता राज्यभरात ११वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात १९ मेपासून सुरू होणार असून, ११वीचे वर्ग ऑगस्ट महिन्याच्या ११ तारखेपासून सुरू होणार आहेत.
राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड, अमरावतीसह आता अहिल्यानगरमध्ये देखील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन केंद्रीय पद्धतीने राबवली जाणार आहे. मात्र, केवळ राज्य राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांचाच यात समावेश असणार आहे.
शाळा-महाविद्यालयांना कसं होता येणार या प्रक्रियेत सामील?
शासन मान्यताप्राप्त, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित, अंशत: अनुदानित या सर्व प्रकारच्या शाळा आणि महाविद्यालयांना या प्रवेश प्रक्रियेत सामील होता येणार असून, यासाठी त्यांना १५ मेपर्यंत शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे.
विद्यार्थ्यांना कधी आणि कशी करावी लागेल प्रक्रिया?दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १९ मेपासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना १० पसंती क्रमांक द्यावे लागणार आहेत. त्यानंतर २८ मेपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या एकूण चार फेऱ्या होतील, तर, पाचवी फेरी खुल्या पद्धतीने गुणवततेनुसार राबवली जाईल. मात्र, अद्याप यासाठीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत.
ऑनलाईन केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवताना व्यवस्थापनासाठी ५ टक्के जागा, ५० टक्के जागा अल्पसंख्यांकांसाठी, तर त्याच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा राखीव असणार आहेत.