Rohit Pawar Ram Shinde: 'अपेक्षा एकच आहे, त्यांनी (राम शिंदे) राजकारण जरूर करावं पण घटनात्मक पदावर राहून या पदाची प्रतिष्ठा मलिन होणार नाही याची आणि कर्जत जामखेडच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, याची काळजी घ्यावी', अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी त्यांचे मतदारसंघातील राजकीय विरोधक आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२०२४ विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांचा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात निसटता पराभव झाला. रोहित पवारांनी सलग दुसऱ्यांदा त्यांचा पराभव केला. पण, त्यांनी आता २०२९ च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
वाचा >>मराठी-अमराठी वाद पेटला; मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंना धमकीचा फोन
दरम्यान, राम शिंदे यांनी कर्जत नगर पंचायतीच्या नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेतली. याच मुद्द्यावरून आता आमदार रोहित पवारांनी रा शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
रोहित पवार म्हणाले, 'विडा उचलला की काय, अशी शंका येते'
रोहित पवारांनी राम शिंदे यांचे पत्रकार परिषदेतील फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. "राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती ही घटनात्मक पदं असून, महाराष्ट्रात या पदांवरील व्यक्तींना विशेष मानसन्मान आहे. कारण या पदांवरील आजवरच्या सर्वांनीच स्वतःला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवत या पदांचा मान सन्मान वाढवला, पण अलीकडच्या काळात या पदांवरील व्यक्तींनी राजकीय भूमिका घेऊन पदाचं अवमूल्यन करण्याचा विडा उचलला की काय, अशी शंका येते."
परंपरा आणि संकेतांना धुळीस मिळवलं -रोहित पवार
"विधान परिषदेच्या सभापती महोदयांनी तर विधिमंडळातील दालनात कर्जत नगर पंचायतीच्या काही नगरसेवकांसोबत पत्रकार परिषद घेऊन एका क्षणात विधिमंडळाच्या प्रथा, परंपरा आणि संकेतांना धुळीस मिळवलं. वास्तविक प्रथा परंपरा, निष्ठा, विचार यांची बरोबरी पैशात कधीही होऊ शकत नाही, त्यामुळं कर्जत-जामखेडने पैशांपेक्षा प्रथा, परंपरा, निष्ठा आणि विचार कायमच जपला. पण आज...????", असे म्हणत रोहित पवारांनी राम शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागली.
"एक मात्र बरं झालं, यानिमित्ताने फोडाफोडीमागे कुणाचा चेहरा आहे, हे उघड झालं. आता अपेक्षा एकच आहे, त्यांनी राजकारण जरूर करावं पण घटनात्मक पदावर राहून या पदाची प्रतिष्ठा मलिन होणार नाही याची आणि कर्जत जामखेडच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, याची काळजी घ्यावी", असा टोला रोहित पवारांनी राम शिंदे यांना लगावला आहे.