जानकरांचं एक पाऊल मागे; ५७वरून आले १४ जागांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 17:47 IST2019-08-25T17:40:52+5:302019-08-25T17:47:50+5:30
विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याचा खुलासा सुद्धा यावेळी जानकर यांनी केला.

जानकरांचं एक पाऊल मागे; ५७वरून आले १४ जागांवर
मुंबई - विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. मात्र असे असताना ही महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटू शकला नाही. एकीकडे भाजप-शिवसेना यांच्यात याच मुद्द्यावरून रस्सीखेच सुरू असतानाच, राष्ट्रीय समाज पक्षाला भाजपकडून ५७ जागा मिळाव्यात अशी मागणी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केली होती. मात्र आता जानकर यांनी एक पाऊल मागे घेत, महायुतीत १४ जागा तरी विधानसभेत मिळाव्यात अशी मागणी केली. मुंबई येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या महामेळाव्यात ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत लोकसभाप्रमाणेच महायुती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. मात्र आधी घटकपक्षांच्या जागांचा निर्णय घेऊ, त्यांनतर भाजप-शिवसेना जागावाटप करणार असल्याचा दावा मुख्यमंत्री यांनी केला आहे. त्यामुळे महादेव जानकर यांनी रासपला ५७ जागा सोडण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र आता जानकर यांनी एक पाऊल मागे घेत, किमान १४ जागा तरी आपल्या पक्षाला सोडाव्यात अशी मागणी भाजपकडे केली आहे.
गेल्यावेळी २ जिल्हा परिषद सदस्य असताना आम्हाला ६ जागा दिल्या होत्या. आता आमच्याकडे ९८ जिल्हा परिषद सदस्य आहेत. आमच्या पक्षाची ताकद पाच वर्षात मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आम्हाला किमान १४ जागा तरी देण्यात यावेत असे जानकर म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याचा खुलासा सुद्धा यावेळी जानकर यांनी केला.