भाईंदरमध्ये सदनिकेचे छत कोसळून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 00:09 IST2021-06-15T00:07:28+5:302021-06-15T00:09:07+5:30
भाईंदर पश्चिमेच्या क्रॉस गार्डन भागातील जुन्या इमारतीतील सदनिकेचे छत कोसळून ३९ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे.

भाईंदरमध्ये सदनिकेचे छत कोसळून एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड: भाईंदर पश्चिमेच्या क्रॉस गार्डन भागातील जुन्या इमारतीतील सदनिकेचे छत कोसळून ३९ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे.
भाईंदर पश्चिमेला क्रॉस गार्डन भागात बाकॉल स्ट्रीट परिसरात ब्रिटो कुटुंबियांची रोज विला नावाची १९८२ साली बांधलेली जुनी इमारत आहे. एका बाजूस तीन तर एका बाजूस दोन मजली असलेल्या या इमारतीत ८ सदनिका आहेत.
सदर इमारत धोकादायक अवस्थेत होती. गेल्यावर्षी महापालिकेने सदर इमारतीस धोकादायक असल्याची नोटीस सुद्धा बजावली होती. परंतु त्यानंतर देखील सदर धोकादायक इमारतीवर कार्यवाही केली गेली नाही. तर सदर इमारतीत राहणारे रहिवाशी सुद्धा इमारत धोकादायक असताना जीवाची पर्वा न करता निष्काळजी पणे त्यातच रहात होते.
सोमवारी अडीचच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील एका सदनिकेच्या छताचे प्लॅस्टर खाली कोसळले. त्यावेळी खाली असलेले कॉमिल ब्रिटो यांच्या अंगावर स्लॅब पडला. यामुळे डोक्याला आणि अन्य भागास जबर मार लागला. त्यांना महापालिकेच्या भीमसेन जोशी रुग्णालयात नेले असता तेथे ते मृत असल्याचे घोषित करण्यात आले. या दुर्घटनेनंतर महापालिकेने अग्निशमन दलाच्या मदतीने सदर इमारत रिकामी केली आहे.