One-click information about blood transfusions in the state | राज्यातील रक्तसाठ्याची माहिती एका क्लिकवर
राज्यातील रक्तसाठ्याची माहिती एका क्लिकवर

- राजकुमार चुनारकर 

चिमूर (चंद्रपूर) : राज्यभरातील ब्लड बँकांमध्ये असलेल्या रक्तसाठ्याची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र शासनाने ब्लड ट्रान्सफ्युजन कौन्सिलची वेबसाईट तयार केली आहे. यावरुन ही माहिती कुणालाही उपलब्ध होणार आहे.
‘महाएसबीटीसी डॉट ओआरजी’ ही बेवसाईट असून त्यावर फाईंड ब्लड या आॅप्शनला क्लिक करताच राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्याची माहिती तत्काळ मिळणार आहे. तसेच या बेवसाईटवर रक्तदात्यांना आपली नोंदही करता येणार आहे.

२०१७ रोजी ही वेबसाईट सुरू करण्यात आली; मात्र तिच्यावर नियमित माहिती दिली जात नव्हती. शासनाने याबाबत कडक धोरण राबविल्याने सदरची वेबसाईट दररोज अपडेट करण्यात येत आहे.सध्या शासकीय रूग्णांलयांमध्ये काही रक्तगटांच्या रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना बऱ्याचवेळा रक्त नाही, असे उत्तर मिळते. अशावेळी गप्प राहण्याव्यतिरिक्त तरणोपाय नसतो. ‘महाएसबीटीसी डॉट ओआरजी’ या संकेतस्थळावर रक्त किती आहे, कोणत्या पेढीत आहे, त्याची वर्गवारीही मिळते.

राज्यात ४६७ रक्तपेढ्या
राज्यातील ३६ जिल्ह्यात ४६७ रक्तपेढ्या आहेत. सर्वाधिक ८९ मुंबईमध्ये असून पुणे ४८ तर ठाणे येथे ४२ रक्तपेढ्या आहेत. कोकणात ६४ रक्तपेढ्या आहेत.

Web Title: One-click information about blood transfusions in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.