बेचिराख! धुराच्या लोटांतून उडाल्या अनेक जीवांच्या चिंधड्या..., आयुध निर्माणीमधील स्फोटाने बसल्या कानठळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 08:55 IST2025-01-25T08:36:17+5:302025-01-25T08:55:49+5:30
Bhandara Ordnance Factory Blast: जवाहरनगरच्या अगदी चौकात महामार्गावर संदेश असिया यांचा चहा, बेकरी व नाष्ट्याचा स्टॉल आहे. सर्व काही नेहमीप्रमाणे सुरळीत असताना अचानकपणे जोरदार स्फोटाचा आवाज आला.

बेचिराख! धुराच्या लोटांतून उडाल्या अनेक जीवांच्या चिंधड्या..., आयुध निर्माणीमधील स्फोटाने बसल्या कानठळ्या
भंडारा - जवाहरनगरच्या अगदी चौकात महामार्गावर संदेश असिया यांचा चहा, बेकरी व नाष्ट्याचा स्टॉल आहे. सर्व काही नेहमीप्रमाणे सुरळीत असताना अचानकपणे जोरदार स्फोटाचा आवाज आला. कानठळ्या बसविणाऱ्या या आवाजासोबतच इमारत हलल्यासारखी वाटली. इमारत पडण्याच्या भीतीने साऱ्या ग्राहकांनी हातामधील नाष्ट्याच्या प्लेट सोडून बाहेर धाव घेतली. भूकंप की स्फोट काहीच कळत नव्हते. नंतर आयुध निर्माणीत स्फोट झाल्याचे कळल्यावर सर्वांनाच धोक्याची कल्पना आली.
हादरे थेट भंडाऱ्यापर्यंतघटनास्थळ ते भंडारा शहरापर्यंतचे अंतर १६ किलोमीटरचे आहे. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, त्याचे हादरे थेट भंडारा शहरापर्यंत पोहोचले. अनेकांना अचानकपणे खिडक्यांचा काचा हालत असल्याचे जाणवले. काही घराच्या दारांनाही हवेच्या दाबाचा धक्का बसला. यामुळे हा भूकंपाचा धक्काच वाटला.
बर्फ फोडून काढणारे लो टेंपरेचर प्लास्टिक एक्स्प्लोसिव्ह
भंडारा : बर्फाळ प्रदेशाला फोडून काढण्याची क्षमता ज्या स्फोटकांमध्ये असते. त्या ‘लो टेंपरेचर प्लास्टिक एक्सप्लोसिव्ह’ची निर्मिती भंडारा येथील आयुध निर्माणीमध्ये केली जाते. आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात असताना येथे हा शक्तिशाली स्फोट झालाच कसा, असा प्रश्न सामान्यांसह सुरक्षा यंत्रणा आणि संबंधित तज्ज्ञांनाही पडला आहे. त्यामुळे स्फोटाचे कारण जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या तज्ज्ञांच्या चमू भंडारा येथे बोलावून घेण्यात आल्या आहेत.
भंडारा शहरापासून सुमारे १६ किलोमीटर अंतरावर साहुली गावाजवळ ही फॅक्टरी आहे. तेथील सूत्रांच्या माहितीनुसार, हजारावर कामगार तेथे वेगवेगळ्या सेक्शनमध्ये आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात. येथे अत्यंत उच्च दर्जाची स्फोटके तयार केली जातात. स्फोट नेमका कसा झाला, ते स्पष्ट न झाल्याने नागपुरातून सेंट्रल फॉरेन्सिक टीमसह, संबंधित तज्ज्ञांची पदके दाखल झाली आहेत.
१ काेटीची मदत देण्याची मागणी
कंपनीत कामाच्या परिस्थिती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
त्यामुळे चुका ओळखण्यासाठी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्फोटाच्या कारणांची सखोल चौकशी करावी. अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात.
तसेच मृतांच्या कुटुंबीयांना १ कोटींची तत्काळ आर्थिक भरपाई मंजूर करावी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना नाेकरी द्यावी, अशी मागणी इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशनचे
अध्यक्ष अशाेक सिंग यांनी सरंक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.