ओबीसी विद्यार्थ्यांना छात्रवृत्ती मिळेना, 'महाज्योती'च्या प्रक्रियेला विलंब
By संदीप आडनाईक | Updated: January 24, 2026 15:49 IST2026-01-24T15:48:50+5:302026-01-24T15:49:12+5:30
थकीत निधीही मंजूर न झाल्याने संताप

ओबीसी विद्यार्थ्यांना छात्रवृत्ती मिळेना, 'महाज्योती'च्या प्रक्रियेला विलंब
संदीप आडनाईक
कोल्हापूर : नोंदणी दिनांकापासूनची अधिछात्रवृत्ती मिळण्यासाठी महाज्योतीच्याच प्रक्रियेला विलंब होत असल्याबद्दल राज्यातील नऊशेहून अधिक ओबीसी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
बार्टी व सारथीच्या धर्तीवर महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) देण्याची प्रक्रिया राज्य शासन, महाज्योती आणि इतर मागास बहुजन मंत्रालयाने अद्याप सुरूच केलेली नाही. इतर दोन संस्थांची प्रक्रिया वेळेवर पूर्ण झाली, मात्र महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी अद्याप मागील थकीत निधीच मंजूर झालेला नसताना आता संस्थेकडून सहा महिन्याला होणारी कागदपत्रांची मागणीही वेळेवर होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या संतापात भर पडली आहे. महाज्योतीचे प्रशासन हलगर्जीपणा करीत असल्याचा आरोप संबंधित विद्यार्थ्यांनी केला आहे.
कागदपत्रांची तपासणी करून त्रुटी नसल्यास विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती अदा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. परंतु जानेवारी संपत आला तरीही जुलै ते डिसेंबर २०२५ दरम्यानची संशोधन प्रगती अहवाल संदर्भातील कागदपत्रे मागविण्याची प्रक्रिया संस्थेने सुरूच न केल्यामुळे ओबीसी, भटके विमुक्त विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
बार्टी आणि सारथी संस्थेस नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्तीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला, परंतु महाज्योतीच्या ओबीसी, भटके विमुक्त विद्यार्थ्यांना आवश्यक निधी उपलब्ध करून दिलेला नाही. असा भेदभाव करून बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थेस लागू केलेल्या समान धोरणाला राज्य शासनानेच केराची टोपली दाखविल्याची तक्रार होत आहे.
दैनंदिन खर्चाची विवंचना
अनेक विद्यार्थी संशोधनाच्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यांना तथ्य संकलनासाठी विविध ठिकाणी भेटी द्याव्या लागतात. त्यासाठी येणारा खर्च, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा विविध रसायनांवरही अफाट खर्च, संशोधन केंद्राच्या ठिकाणीच राहणाऱ्यांना घरभाडे, जेवण असा दैनंदिन खर्च करण्याची विवंचना आहे. अधिछात्रवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय न करण्याचे आदेश संस्थेने पूर्वीच दिले आहेत. त्यामुळे ते या छात्रवृत्तीवरच अवलंबून आहेत.
महाज्योती संस्थेमार्फत कागदपत्रे मागविण्याच्या प्रक्रियेला यंदा विलंब झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक व मानसिक ताण येत आहे. विद्यार्थ्यांचे संशोधन पूर्णतः अधिछात्रवृत्तीवर अवलंबून आहे, त्यामुळे तातडीने ही प्रक्रिया सुरू करून अधिछात्रवृत्ती अदा करावी. - सद्दाम मुजावर, महाज्योती संशोधक