SP NCP MP Bajrang Sonawane: भगवान गडाचे महाराज या प्रकरणात का बोलले ते मला माहिती नाही. मला त्यांच्यावर भाष्य करायचे नाही. भगवान गड हे सर्व जाती-धर्मांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे भगवान गड एकाच समाजाच्या पाठीशी उभा राहील, असे मला वाटत नाही. धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आहे, तर तो त्यांचा अधिकार आहे. मला माफ करा, मी त्यांच्या अधिकाऱ्यावर बोलणे योग्य नाही. मला या प्रकरणात महाराजांना आणायचे नाही. त्यांना यावर प्रतिक्रिया का द्यावीशी वाटली हे माहिती नाही. आजपर्यंत कोण्या महाराजांनी एखाद्या व्यक्तीचे नाव घेऊन त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले नाही. भगवान गडाची उंची खूप मोठी आहे, महाराजांची उंची खूप मोठी आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी महंत नामदेवशास्त्री महाराजांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नामदेवशास्त्रींनी जाहीर केलेल्या पाठिंब्यावर बजरंग सोनावणे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
धनंजय मुंडेंना भगवान गडाचा आधार का घ्यावा लागतो, पक्षावर विश्वास नाही का
बजरंग सोनावणे म्हणाले की, भगवान गडाचे पावित्र्य मोठे आहे. त्याबाबत नामदेवशास्त्रींनी काय बोलावे, हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. मी त्यावर काही बोलणार नाही. आधीपासूनच भगवान गडाचा त्यांना पाठिंबा आहे. धनंजय मुंडे यांना भगवान गडाचा आधार का घ्यावा लागतो, हेच मला कळत नाही. त्यांना असे वाटत आहे की, त्यांचा पक्ष, त्यांचे नेते, त्यांचे सरकार हे त्यांच्यापासून बाजूला जायला लागले आहे. यासाठीच ते भगवान गडाकडे आले का, हे माहिती नाही. भगवान गडाने कोणाला पाठिंबा द्यावा हा त्यांचा अधिकार आहे, असे बजरंग सोनावणे म्हणाले.
कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री यांचाच
एकीकडे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यावर, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितले तर राजीनामा देण्याची तयारी धनंजय मुंडे यांनी दाखवली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतली असे सांगितले. या दोघांच्या विधानावर भाष्य करताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार निर्णय घेतील, असे फडणवीस म्हणाले. या तीनही विधानांवर भाष्य करताना बजरंग सोनावणे म्हणाले की, मला जेवढे राजकारण कळते किंवा ज्ञान आहे, त्यातून मला एकच वाटते की, कोणत्याही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करणे किंवा त्याचा राजीनामा घेण्याचा किंवा तो मंजूर करण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे. मुख्यमंत्री दुसऱ्यांवर बोट का दाखवतात, हे मला माहिती नाही. तिघेही एकमेकांकडे बोट का करत आहेत, यावर मला भाष्य करायचे नाही.
महंत नामदेवशास्त्री नेमके काय म्हणाले?
भगवान गड भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. केवळ पाठीशी नाही. यात दोन भाग आहेत. जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध सुरू आहे. मला माध्यमांना एक विचारावेसे वाटते की, ज्या लोकांनी हे प्रकरण केले, निर्घृण हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली, हे माध्यमांनी का दाखवले नाही. कारण अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे. ती पण दखल घेण्यासारखी आहे, असे मला वाटते. त्यांचा गावातील, बैठकीतील विषय आहे. संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असे मला वाटते. गावचा मुद्दा आहे. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना. त्याच्यावर माध्यमे आक्षेप घेत आहेत. ५३ दिवस झाले मीडिया ट्रायल सुरू आहेत. यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून माणूस किंवा गुन्हेगार नाही. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवत आहात. त्याची पार्श्वभूमी ही नाही ना, असे सांगत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली.