स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 10:00 IST2025-07-23T09:59:44+5:302025-07-23T10:00:09+5:30

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.

Now you can travel to Goa by train with your own car! How? Find out... | स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...

स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...

नवी मुंबई :  गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेने आता ‘रो-रो’ म्हणजेच ‘रोल ऑन-रोल ऑफ’ सेवा खासगी कारसाठीही सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  ही सेवा २३ ऑगस्टपासून कोलाडहून, तर २४ ऑगस्टपासून वेरणाहून सुरू होईल. ही सेवा एक दिवसआड सुरू राहणार असून, ११ सप्टेंबरपर्यंत सुरू राहील. या सेवेमुळे वाहनधारकांना सुरक्षित, किफायतशीर आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

भारतात पहिल्यांदाच प्रवासी कारसाठी अशी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. कोकण रेल्वेने १९९९ पासून ट्रक वाहतुकीसाठी ‘रो-रो’ सेवा यशस्वीपणे वापरली आहे. पश्चिम घाटातील अवघड मार्गांमुळे होणारी वाहतूक कोंडी, इंधन खर्च आणि प्रदूषण कमी करण्यासाठी ही सेवा प्रभावी ठरली आहे. आता  खासगी वाहनधारकांसाठी प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू केली जात आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या मुंबई, ठाणे आणि पनवेल परिसरातील प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे रस्त्यावरचा २०-२२ तासांच्या कंटाळवाण्या प्रवासाऐवजी आता फक्त १२ तासांमध्ये कारसह गोव्यात पोहोचता येईल, असे कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी स्पष्ट केले आहे.

सेवेचे मुख्य आकर्षण
या सेवेसाठी खास तयार केलेल्या रेकमध्ये प्रत्येकी २ कार घेणाऱ्या २० वॅगन असून, एकूण ४० कारची वाहतूक करण्याची क्षमता आहे. एका कारला प्रत्येक फेरीसाठी  ७८७५ रुपये  (जीएसटीसह)  शुल्क निश्चित केले आहे. त्यापैकी बुकिंगवेळी ४००० रुपये  नोंदणी शुल्क भरावे लागेल आणि उर्वरित रक्कम प्रवासाच्या दिवशी अदा करावी लागेल. त्याचप्रमाणे  प्रत्येक कारमध्ये तीन प्रवाशांना थ्रीएसी  किंवा सेकंड सीटिंग डब्यात प्रवास करता येणार आहे. त्यासाठी अनुक्रमे ९३५ आणि  १९० रुपये प्रतिप्रवासी शुल्क आकारले जाणार आहे. रस्त्याने प्रवास केल्यास २० ते २२ तास लागतात. मात्र, हा प्रवास आता फक्त १२ तासांत पूर्ण करता येईल. ही ट्रेन  कोलाडहून सायंकाळी ५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता वेरणात पोहोचणार आहे.

Web Title: Now you can travel to Goa by train with your own car! How? Find out...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.