आता आमदारांना द्यावे लागणार 'रिपोर्ट कार्ड', पंतप्रधान मोदींना राज्यासाठीचे व्हिजनही द्यावे लागणार!
By यदू जोशी | Updated: January 14, 2025 07:44 IST2025-01-14T07:43:31+5:302025-01-14T07:44:31+5:30
महायुतीच्या महाविजयानंतर पंतप्रधान मोदी हे महायुतीच्या आमदारांचा पहिल्यांदाच अडीच तासांचा क्लास घेणार आहेत.

आता आमदारांना द्यावे लागणार 'रिपोर्ट कार्ड', पंतप्रधान मोदींना राज्यासाठीचे व्हिजनही द्यावे लागणार!
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या आमदारांशी १५ जानेवारीला मुंबई दौऱ्यात संवाद साधणार असून त्यावेळी आमदारांना त्यांचे रिपोर्ट कार्ड द्यावे लागणार आहे. तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेश देण्यात आला आहे. महायुतीच्या महाविजयानंतर पंतप्रधान मोदी हे महायुतीच्या आमदारांचा पहिल्यांदाच अडीच तासांचा क्लास घेणार आहेत.
आमदारांना या संवादाची उत्सुकता आहेच, पण आता त्यांना मोदींच्या क्लाससाठी काय तयारी करून ठेवायची आहे, या संबंधीचे एक पत्र देण्यात आले आहे. हे पत्र बघितल्यानंतर आमदार जरा धास्तावलेदेखील आहेत. विशेषतः कुठली तयारी करून यायचे आहे यासंबंधी पत्रात सूचना करण्यात आल्या असून आता सगळे आमदार त्या दृष्टीने तयारीला लागले आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना या सूचना केल्या आहेत.
इतके बहुमत कसे मिळाले?
महायुतीला विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाले. आपल्या मते या यशाची कारणे कोणती? हे पंतप्रधान मोदी आमदारांकडून जाणून घेण्याची शक्यता आहे. अडीच वर्षातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने काय काय केले, त्याचा राज्याला किती फायदा झाला?
केंद्र आणि राज्याच्या योजनांची अंमलबजावणी कशी करता?
- आपण आमदार म्हणून मतदारसंघात काय करत आहात, आता काय करणार आहात याची संक्षिप्त टिपणी तयार करून ठेवायला आमदारांना सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांनी काही अचानक विचारले तर तुमची तयारी असली पाहिजे. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची २ अंमलबजावणी तुमच्या मतदारसंघामध्ये किती प्रभावीपणे होत आहे याचा अहवालही तयार ठेवायला सांगितले आहे.
- राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनाचा २ अंमलबजावणी तुमच्या मतदारसंघामध्ये किती प्रभावीपणे होत आहे याचा अहवालही तयार ठेवायला सांगितले आहे.
- तसेच, मतदारसंघातील केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थीची सध्याची सामाजिक, आर्थिक स्थिती काय आहे, या योजनांमुळे त्यांच्या जीवनात काय परिवर्तन आले याची माहितीही द्यायला सांगण्यात आले आहे, अशी माहिती महायुतीच्या एका आमदाराने 'लोकमत'ला दिली.
मतदारांशी संपर्क करता काय?
मतदारसंघात मतदारांशी कायम संपर्कात राहण्यासाठी कुठले उपक्रम राबवता, जनसंपर्काची पद्धत काय आहे? आपला मतदारसंघ आणि राज्याच्या विकासाचे पुढील पाच वर्षांसाठीचे आपले व्हिजन काय आहे याची माहितीदेखील आमदारांना तयार ठेवायला सांगण्यात आले आहे.