आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 08:47 IST2026-04-12T08:46:46+5:302026-04-12T08:47:44+5:30
Mumbai News: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शासनाने नागपूर येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, महाराष्ट्र’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
मुंबई - राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शासनाने नागपूर येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, महाराष्ट्र’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ही संस्था पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे. राज्यातील आरोग्य क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षणासाठी ती केंद्रबिंदू ठरणार आहे. या संस्थेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने १२० कोटींचा निधी मंजूर केला आहे.
राज्यात बदलत्या सार्वजनिक आरोग्य गरजांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमतावृद्धीची मोठ्या प्रमाणात गरज आहे. ही संस्था शिक्षण, संशोधन, अंमलबजावणी सहाय्य, नियोजन, निरीक्षण आणि मूल्यमापन अशा विविध क्षेत्रांत आरोग्य विभागाला तांत्रिक पाठबळ देणार आहे. तसेच, नवीन प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याबरोबरच विद्यमान कर्मचाऱ्यांचे कौशल्यवर्धन आणि क्षमता विकास साधण्यावर भर दिला जाणार आहे.
या संस्थेसाठी नागपूर जिल्ह्यातील खापरी येथील सुमारे ५.१ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संस्थेचे कामकाज कंपनी अधिनियमांतर्गत कलम ८ नुसार स्थापन होणाऱ्या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. या कंपनीमध्ये शासनाचे प्रतिनिधी, पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ तसेच सामाजिक क्षेत्रातील जाणकारांचा समावेश राहणार आहे. यामुळे संस्थेच्या कार्यात शैक्षणिक, तांत्रिक आणि सामाजिक समन्वय साधला जाणार आहे.
५० कोटींचा कॉर्पस फंड उपलब्ध करून देणार
आर्थिक बाबींचा विचार करता, आरोग्य विभागाने या प्रकल्पासाठी १२० कोटींचा भांडवली निधी तसेच ५० कोटींचा कॉर्पस फंड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निधीच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधा, संशोधन केंद्रे आणि प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्यात येणार आहेत.