लातूरमध्ये आणखी एका गावातील २५ शेतकऱ्यांना नोटिसा; 'वक्फ'चा १७५ एकर जमिनीवर दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:00 IST2024-12-13T10:59:44+5:302024-12-13T11:00:11+5:30

शेतकऱ्याच्या मालकीची एक इंचही जमीन कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही, भाजपा आमदाराचं शेतकऱ्यांना आश्वासन

Notice from Waqf Tribunal to 25 farmers of Budhoda village in Ausa taluka of Latur district, claim on 175 acres | लातूरमध्ये आणखी एका गावातील २५ शेतकऱ्यांना नोटिसा; 'वक्फ'चा १७५ एकर जमिनीवर दावा

लातूरमध्ये आणखी एका गावातील २५ शेतकऱ्यांना नोटिसा; 'वक्फ'चा १७५ एकर जमिनीवर दावा

लातूर - अलीकडेच अहमदपूरच्या तळेगावातील शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाकडून नोटिसा आल्याचं प्रकरण ताजे असतानाच आणखी एका गावात हाच प्रकार समोर आला आहे. लातूरच्या औसा तालुक्यातील बुधोडा गावातील २५ शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्यूनलकडून नोटिसा मिळाल्या आहेत. गावातील जवळपास १५० ते १७५ एकर जमिनीवर दावा सांगण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे राहणाऱ्या समशाद अझगर हुसैन यांनी वक्फ न्यायाधिकरणाकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारीवरून वक्फ ट्रिब्यूनलने बुधोडा गावातील शेतकऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. या गावातील शेतकरी राजेश बुधोडकर यांनी सांगितले की, आम्हाला ही नोटीस तारीख निघून गेल्यानंतर आली होती. मात्र या महिन्यात ४ डिसेंबरला आम्ही हजर झालो नेमकं काय प्रकरण आहे त्यासाठी आम्ही वकील केला. आम्हाला पुढची तारीख २८ डिसेंबर दिली आहे. बुधोडा गावातील २५ शेतकऱ्यांच्या १५०-१७५ एकर जमिनीवर दावा करण्यात आला आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच आम्ही २५ शेतकऱ्यांनी मिळून एक वकील नेमला आहे. विनाकारण त्रास देण्याचं काम आहे. १९५५ साली माझ्या आजोबाच्या नावे जमीन लागली होती. आता आमची चौथी पिढी शेतात राबतेय आणि आज अचानक दावा ठोकला जातोय असंही राजेश बुधोडकर यांनी म्हटलं. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वक्फकडून शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यात प्रामुख्याने लातूर जिल्ह्यातील तळेगाव गावातील प्रकार उघडकीस आला आणि आता बुधोड गावातील शेतकऱ्यांना नोटीस दिल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लातूर जिल्ह्यातील तळेगाव इथल्या ३०० एकर जमिनीवर वक्फनं दावा केला आहे. वक्फची संपत्ती इस्लामी कायद्यानुसार केवळ धार्मिक आणि लोकोपयोगी कामासाठी वापरली जाऊ शकते. त्यातून वक्फ ट्रिब्यूनलकडे आलेल्या तक्रारीवरून लातूरमधील १०३ शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली. या जमीन वादात सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानंतर आता बुधोडमध्येही हाच प्रकार घडला आहे. तर शेतकऱ्यांनी निश्चित रहावे, एकाही शेतकऱ्याच्या मालकीची एक इंचही जमीन कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही. मी भक्कमपणे आपल्या पाठीशी उभा आहे असं आश्वासन भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी दिले आहे. 

Web Title: Notice from Waqf Tribunal to 25 farmers of Budhoda village in Ausa taluka of Latur district, claim on 175 acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.