आदिवासीबहुल भागात ‘नोटा’ला सर्वाधिक मतदान; पालघर आणि गडचिरोलील प्रमाण जास्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 20:27 IST2019-05-24T20:26:40+5:302019-05-24T20:27:40+5:30
राज्यात ‘नोटा’ला सर्वाधिक २९ हजार ४७९ मते (२.४५ टक्के) पालघर लोकसभा क्षेत्रात, तर २४ हजार ५९९ मते (२.१५ टक्के) गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात मिळाली आहेत.

आदिवासीबहुल भागात ‘नोटा’ला सर्वाधिक मतदान; पालघर आणि गडचिरोलील प्रमाण जास्त
- मनोज ताजने
गडचिरोली : भारतीय निवडणूक आयोगाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून उपलब्ध करून दिलेला ‘नोटा’चा पर्याय यावेळी राज्यातील आदिवासीबहुल मतदार संघांमध्ये सर्वाधिक वापरण्यात आला आहे. अनेक अशिक्षित मतदारांनी ईव्हीएमवरील सर्वात खाली असलेले बटन दाबल्याने नोटाचे मतदान वाढले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मतपत्रिकेवरील कोणीही उमेदवार पसंत नसेल तर ‘नोटा’, अर्थात ‘नन आॅफ द अबोव्ह’ (यापैकी कोणीही नाही) असा पर्याय ईव्हीएमवरील मतपत्रिकेवर सर्वात शेवटी दिला जातो. अशिक्षित मतदारांना ईव्हीएमवरील कोणते बटन दाबायचे हे कळले नसल्यामुळे शेवटचे बटन दाबून ते मोकळे होतात, असा अनुभव अनेक ठिकाणी आला आहे. त्यामुळेच की काय आदिवासीबहुल, मागास भागात नोटाच्या मतांचे प्रमाण जास्त आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीतही गडचिरोली-चिमूर क्षेत्रात नोटाला इतर मतदार संघांच्या तुलनेत सर्वाधिक मतदान होते.
राज्यात ‘नोटा’ला सर्वाधिक २९ हजार ४७९ मते (२.४५ टक्के) पालघर लोकसभा क्षेत्रात, तर २४ हजार ५९९ मते (२.१५ टक्के) गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात मिळाली आहेत. याशिवाय ठाणे, नंदूरबार या आदिवासीबहुल जिल्ह्यांतही नोटाचे प्रमाण जास्त आहे. केवळ मतदारांच्या अशिक्षितपणामुळे त्यांच्याकडून नोटाचा पर्याय निवडल्या जात असेल तर यापुढील निवडणुकांमध्ये योग्य ती सुधारणा करावी अशीही मागणी सूज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.
मुंबईतही नोटा
प्रगत मुंबईमधील सहाही मतदार संघात नोटाचे प्रमाण जास्त आहे. त्यात मुंबई-दक्षिण (१.८९ टक्के), मुंबई-उत्तर (१.२१ टक्के), मुंबई उत्तर-मध्य (१.१८ टक्के), मुंबई उत्तर-पूर्व (१.३७), मुंबई उत्तर पश्चिम (१.९४ टक्के) आणि मुंबई दक्षिण मध्य (१.७५ टक्के) असे नोटाचे प्रमाण आहे.
‘नोटा’धारक टॉप १० मतदार संघ
मतदार संघ नोटाची मते टक्केवारी
पालघर २९,४७९ २.४५ %
गडचिरोली-चिमूर २४,५९९ २.१५ %
नंदूरबार २१,९२५ १.७१ %
ठाणे २०,४२६ १.७५ %
मुंबई उत्तर-दक्षिण १८,२२५ १.९४ %
भिवंडी १६,३९७ १.६३ %
मावळ १५,७७९ १.१५ %
जालना १५,६३७ १.२९ %
मुंबई दक्षिण १५,११५ १.८९ %
कल्याण १३,०१२ १.४६ %