Maharashtra Corona Update: राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, मात्र...; राजेश टोपेंचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 07:11 IST2022-01-02T07:11:15+5:302022-01-02T07:11:37+5:30
Rajesh Tope on Omicron, corona Patients: महाराष्ट्रात ९ हजार १७० नवे कोरोना रुग्ण सापडले. एकट्या मुंबईत ६ हजारांहून अधिक रुग्ण आढळले.

Maharashtra Corona Update: राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, मात्र...; राजेश टोपेंचे सूचक वक्तव्य
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, मात्र निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यात ऑक्सिजनची गरज ७०० मेट्रिक टनावर गेली तरच लॉकडाऊन होईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येेथे सांगितले.
गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे ९,१७० नवे रुग्ण आढळले. एकट्या मुंबईत ६ हजारांहून अधिक रुग्ण आढळले. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ३२ हजारांहून अधिक आहे. ओमायक्राॅनबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, या रूग्णांची तब्येत गंभीर नाही. डेल्टामुळे रुग्णांची तब्येत बिघडते आणि ऑक्सिजन लागतो, मृत्यूचे प्रमाण वाढते. त्यामुळे ओमायक्राॅन व डेल्टाचे प्रमाण कळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या कुणीही घाबरून जाऊ नये, असे म्हणाले. परवा ५ हजार रुग्ण होते. काल साडेआठ हजार झाले.
प्रत्येक विभागात जिनोम सिक्वेन्सिंग
n प्रत्येक विभागात जिनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
n एस जीन किट आरोग्य विभागाकडून पुरविण्यात येणार आहे.
n ओमायक्राॅनची रुग्ण तपासणी खासगी प्रयोगशाळेतही करता येईल. मात्र त्यासाठी शुल्क मर्यादा असेल.
२२ हजार नवे रुग्ण
देशात गेल्या चोवीस तासांत
कोरोनाचे २२ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. आदल्या दिवसापेक्षा ही वाढ ३५ टक्के आहे. या काळात सक्रिय रुग्णांचा आकडा १३ हजारांनी वाढला असून ती संख्या एक लाखांवर गेली आहे.
१४३१ ओमायक्रॉनबाधित
ओमायक्रॉनबाधितांची संख्या १४३१ वर पोहोचली असून त्यातील ३७४ जण बरे झाले. अशा प्रकारच्या रुग्णांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असून त्यानंतर दिल्ली, तामिळनाडू, गुजरात, केरळचा क्रमांक लागतो.