मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिल्याने शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीने मुख्यमंत्रीपद मिळविले. यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. आता येत्या 4 महिन्यांत ठाकरेंना विधानसभा किंवा विधानपरिषदेतून निवडून जावे लागणार आहे. विरोधक त्यांची मागच्या दारातून येणार अशी खिल्ली उडवत आहेत. यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.
सामनाचे संपादक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. यामध्ये राऊत यांनी ठाकरेंना प्रश्न विचारला होता. यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न नव्हते, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री होण्याआधी मी त्या विधान भवनात आयुष्यात दोन-चार वेळेहून अधिक गेलो नसेन. असं देशात अपवादात्मक परिस्थितीत झालं असेल की, एखादी व्यक्ती जी तिकडे येण्याचं कधी स्वप्न नव्हतं ती व्यक्ती येते तेच मुख्यमंत्री म्हणून. मी नेहमी सांगतो, जबाबदारीतून मी कधी पळ काढलेला नाही आणि काढणार नाही. त्यामुळे कुणालाही न दुखावता जे शक्य असेल ते मी करेन, असे ठाकरे म्हणाले.
मी काय धर्मांतर केलंय? आणि तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व असं ब्रह्मवाक्य आहे की काय? की घटनेत लिहिलंय की, हे म्हणतील तेच हिंदुत्व. आपण म्हणजे सर्वज्ञानी, सर्वव्यापी असा आव कुणी आणू नये. आपण म्हणतो तेच खरं आणि बाकीचे म्हणतील ते झूठ हा हास्यास्पद दावा आहे. त्यांच्यापुरता हा दावा त्यांनी त्यांच्या कार्यालयात करायला हरकत नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.