कोणाचेही पूज्य पिताजी मुंबई तोडू शकणार नाहीत

By Admin | Updated: December 16, 2014 01:10 IST2014-12-16T01:10:11+5:302014-12-16T01:10:11+5:30

मुंबई काल महाराष्ट्रात होती, आज आहे आणि उद्याही राहील. कोणाचे पूज्य पिताश्री आले तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाहीत आणि आम्ही ते होऊ देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nobody will be able to break Mumbai | कोणाचेही पूज्य पिताजी मुंबई तोडू शकणार नाहीत

कोणाचेही पूज्य पिताजी मुंबई तोडू शकणार नाहीत

मुख्यमंत्री : शिवसेनेला दिले चोख प्रत्युत्तर
नागपूर : मुंबई काल महाराष्ट्रात होती, आज आहे आणि उद्याही राहील. कोणाचे पूज्य पिताश्री आले तरी मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकणार नाहीत आणि आम्ही ते होऊ देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी शिवसेनेचे नाव न घेता विधानसभेत प्रत्युत्तर दिले.
मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. त्यावरून शिवसेनेच्या मुखपत्रातून बरीच टीका झाली; शिवाय विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरत सरकारला धारेवर धरले होते.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईविषयी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मांडलेल्या भूमिकेवरून गहजब निर्माण केला जात आहे. छगन भुजबळ यांच्यासारखे ज्येष्ठ नेते त्याबाबत बोलत आहेत, याचे मला आश्चर्य वाटते. मुंबई महापालिका वा एमएमआरडीएच्या अधिकारांत हस्तक्षेप करण्याचा शासनाचा कुठलाही उद्देश नाही.
पायाभूत सुविधांसह मुंबईचे अनेक प्रकल्प केंद्र सरकारकडे विविध प्रकारच्या मान्यतेसाठी जातात. त्यांना फास्ट ट्रॅक मान्यता मिळणे आवश्यक असते. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून या प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घ्यावा. म्हणजे प्रकल्प मार्गी लागतील, अशी मुंबई आणि राज्य हिताची भूमिका मी मांडली. तिचे स्वागत करण्याऐवजी बाऊ केला जात आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार असे आरोप केवळ राजकारण करण्यासाठी केला जात आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही वेगळे करू शकणार नाही. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्प गतीने पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
सीमाभाग मिळालाच पाहिजे
कर्नाटकातील सीमाभाग महाराष्ट्राचा आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे, अशी आमच्या सरकारची भूमिका आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला लढण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातील, असे ते म्हणाले. सीमाभाग हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि मराठी बांधवांच्या अस्तित्वाचा विषय असल्याचे ते म्हणाले.
अभिभाषणाबद्दल राज्यपालांचे अभिनंदन करणारा ठराव मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मंजूर करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)
शिवस्मारकाचे भूमिपूजन १९ फेब्रुवारीला करणार
मुंबईच्या समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकारचे भूमिपूजन येत्या १९ फेब्रुवारीला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. आपल्या सरकारने या स्मारकासाठी अत्यंत आवश्यक असलेली केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी एक महिन्याच्या आत मिळविली. आधीच्या सरकारने या स्मारकाचा अतिशय चांगला आराखडा तयार केलेला आहे, अशी पुस्तीही फडणवीस यांनी जोडली.
-डॉ.आंबेडकर स्मारक उभारण्याचा निर्धार
मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी केंद्र सरकारने या स्मारकाबाबत काही मुद्यांवर राज्य शासनाकडून हमीपत्र मागितले होते. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांना वेळ मिळाला नसेल, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला. ते म्हणाले की, १७ नोव्हेंबरला आपल्या सरकारने हे हमीपत्र पाठविले आहे.
दाभोळ वीज प्रकल्प बंद होणार नाही
दाभोळ वीज प्रकल्पात बँकांचे मोठ्या प्रमाणात पैसे गुंतलेले आहेत. हा प्रकल्प बंद होणे मोठ्या आर्थिक नुकसानीस कारण ठरेल. या प्रकल्पात केंद्र सरकारने मोठा वाटा उचलावा, राज्य सरकार काही नुकसान सहन करेल. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज सेंट्रल ग्रीडमध्ये जाईल. तेथून नियमानुसार राज्याला आपला हिस्सा मिळेल, अशा पद्धतीची बोलणी चालू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कोस्टल रोड करणारच
मुंबईत कोस्टल रोड करणे हा पृथ्वीराज चव्हाण यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. पण केंद्राच्या २०११ च्या अधिसूचनेत त्याचा समावेश त्यांना करून घेता आला नाही. आपले सरकार ते केल्याशिवाय राहणार नाही. नरिमन पॉर्इंट ते मालाडपर्यंतचा ३४ किलोमीटर लांबीच्या या रोडमधील अडथळे आम्ही दूर करू, असे फडणवीस यांनी सांगितले. सागरी मार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करणे, पर्यावरणाचा अभ्यास अहवाल, केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाची मंजुरी आणणे, निविदा प्रक्रिया आदी कामे सल्लागार मे. स्टुप अ‍ॅण्ड कन्झोर्टियम करीत आहे. समुद्रात भराव टाकून सागरी मार्गाच्या बांधकामास तत्त्वत: मंजुरी देण्याबाबत तत्कालीन सरकारने केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना विनंती केली आहे, असे ते म्हणाले.
मुंबई मेट्रोची प्रगती
- नवी-मुंबईमधील बेलापूर ते पेंधर या मेट्रो रेल्वे मार्गिकेचे बांधकाम सिडकोमार्फत प्रगतिपथावर
- मुंबईमधील मेट्रो लाईन - ३ कुलाबा-वांद्रे- सीप्झच्या कामाला पुढील वर्षाच्या सुरुवातीस प्रकल्पाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणे अपेक्षित.
- मुंबई व ठाणे शहरातील वडाला-घाटकोपर-तीन हात नाका (ठाणे)-कासारवडवली या मेट्रो रेल्वे मार्गिकेला मंजुरी.
- मुंबईमधील दहीसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द या सुधारित मेट्रो लाईन - २ मेट्रो रेल्वे मार्गिकेचादेखील सविस्तर प्रकल्प
- कुलाबा-वांद्रे-सीप्झ प्रकल्पाची उभारणी मुंबई मेट्रो रेल महामंडळामार्फत या प्रकल्पाची उभारणी होईल. सल्लागारांची नेमणूक करणे, बांधकाम कंत्राटदारांची पूर्वअर्हता निविदा कामे सुरू झाली आहेत.

Web Title: Nobody will be able to break Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.