“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:02 IST2025-12-20T13:00:50+5:302025-12-20T13:02:04+5:30
Shiv Sena Shinde Group News: स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकीय फायद्यासाठी शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप या महिला नेत्यांवर करण्यात आला होता.

“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
Shiv Sena Shinde Group News: मुंबईसह राज्यभरातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे ठाकरे बंधूंची युती, जागावाटप याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. तर महायुतीच्या बैठकांना जोर आला आहे. यातच पक्ष प्रवेश मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या एका महिला जिल्हाध्यक्षांनी अलीकडेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर त्यांनी काँग्रेस सोडण्याचे कारण स्पष्ट केले.
नवी मुंबईतील ऐरोली विभागातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एम. के. मढवी, विनया मढवी, करण मढवी आणि तेजश्री मढवी यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याचवेळी राष्ट्रीय काँग्रेसचे माजी नगरसेवक मिथुन पाटील, अमित पाटील आणि काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा पूनम मिथुन पाटील यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत भगवा झेंडा हाती घेतला. पूनम पाटील यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून काँग्रेसच्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांनी टीका केली होती. या टीकेला पूनम पाटील यांनी उत्तर दिले.
अनेक अडचणींचा सामना करावा लागला
काँग्रेस पक्षात असताना पक्षश्रेष्ठींकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याने काम करणे कठीण जात होते, असे काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या व शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी जिल्हाध्यक्षा पूनम पाटील यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेस पक्षात काम करत असताना संघटनात्मक पातळीवर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पक्षश्रेष्ठींकडून वेळेवर मार्गदर्शन आणि पाठिंबा न मिळाल्यामुळे जनतेसाठी अपेक्षित काम करता येत नव्हते. कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष बदललेला नाही. जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडता यावेत आणि विकासकामांना गती मिळावी, या उद्देशाने शिंदे गटात प्रवेश केला, असे पूनम पाटील यांनी स्पष्ट केले. काँग्रेस नेते व नवनिर्वाचित काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आबा दळवी यांनी पूनम पाटील यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोप केल्यानंतर त्यावर प्रत्युत्तर देताना पूनम पाटील यांनी हे वक्तव्य केले.
दरम्यान, काँग्रेसचे नेते आबा दळवी यांनी पूनम पाटील यांच्या पक्षप्रवेशावर टीका करताना, त्यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोप केला होता. या आरोपांना पूनम पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. या राजकीय घडामोडींमुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात याचे पडसाद स्थानिक राजकारणात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.