'ते' गांभीर्याने घेण्याची गरज नाही; युवासेनेनं उडवली श्रीकांत शिंदेंची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 14:02 IST2022-09-10T14:01:09+5:302022-09-10T14:02:16+5:30
सध्या आदित्य ठाकरे ज्याप्रकारे काम करतायेत त्यांच्यामागे राज्यातील जनता उभी राहतेय असं वरुण सरदेसाईंनी म्हटलं.

'ते' गांभीर्याने घेण्याची गरज नाही; युवासेनेनं उडवली श्रीकांत शिंदेंची खिल्ली
मुंबई - युवासेना एकच आहे. या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आहेत. बाकी कुणाला काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येक गल्लीबोळात अनेक मंडळं असतं त्यामुळे असं मंडळ स्वत:ला कुणाला स्थापन करावसं वाटत असेल तर त्यांचा विषय आहे असं सांगत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. अलीकडेच शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी युवासेना प्रमुखपदी श्रीकांत शिंदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली होती.
यावर वरुण सरदेसाई यांनी चांगलाच समाचार घेतला. सरदेसाई म्हणाले की, प्रत्येक गणपती मंडळालाही अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कार्यकारणी असते. परंतु त्यांची जी संघटना आहे त्याला फक्त सचिव आहे त्याला वर डोकंपण नाही आणि खाली पाय पण नाही. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सध्या आदित्य ठाकरे ज्याप्रकारे काम करतायेत त्यांच्यामागे राज्यातील जनता उभी राहतेय. गेल्या २ महिन्यात आदित्य ठाकरे राज्यातील प्रत्येक भागात फिरत आहेत. जनताही त्यांना कसा प्रतिसाद देतेय हे मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं आहे असं त्यांनी म्हटलं.
आदित्य ठाकरे मुंबई महापालिकेत चेहरा?
आदित्य ठाकरे हे मुंबईचे पालकमंत्री होते. पालकमंत्री असताना त्यांनी अतिशय चांगले काम केले. मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि या दर्जाला शोभेल असं काम आदित्य ठाकरेंनी केले. मुंबईकर त्यांना प्रतिसाद देतायेत. आता जरी आमचं सरकार नसलं तरी लोक हक्काने आदित्य ठाकरेंकडे प्रश्न घेऊन येत आहेत. तेदेखील मेहनत घेऊन लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायेत. त्यामुळे नेतृत्व जरी उद्धव ठाकरेंचे असले तरी आदित्य ठाकरेंचा चेहरा शिवसेनेसाठी १०० टक्के आश्वासक आहे. मुंबईकर जनतेसाठी आश्वासक आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुकीला सामोरे जावू. या निवडणुकीत आदित्य ठाकरेंची महत्त्वाची भूमिका असेल असंही वरुण सरदेसाईंनी म्हटलं.
काय आहे वाद?
राज्यातील विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंसह ४० शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर राज्यात भाजपाच्या मदतीने सत्तांतर घडलं. परंतु खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला. ठाकरे-शिंदे गटाकडून आमचीच शिवसेना असा दावा करण्यात आला. उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी केलेल्या नेत्यांनी शिंदेंकडून पक्षाच्या पदांवर नेमणूक करण्यात आली. शिवसेनेसोबत युवासेनेतही फेरबदल करण्याचा प्रयत्न केला. त्यात किरण साळी यांना युवासेनेचे सचिवपद एकनाथ शिंदेंगटाकडून देण्यात आले.