उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:20 IST2025-10-20T17:03:28+5:302025-10-20T17:20:10+5:30
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपोषणकर्त्याला घरी बोलावल्यावरुन स्पष्टीकरण दिले.

उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
Sanjay Shirsat: महायुती सरकारच्या 'शासन आपल्या दारी' या लोकप्रिय योजनेच्या धर्तीवर, आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उपोषणकर्ता आपल्या दारी हा एक नवा पॅटर्न पाहायला पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यामुळे पाहायला मिळाला. कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी उपोषण करणाऱ्या एका व्यक्तीला तब्बल नवव्या दिवशी पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी चक्क त्यांच्या घरी जावे लागले आणि तिथेच उपोषण सोडावे लागले. मात्र आता या वादावर मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
कन्नड येथील संदीप विजयकुमार सेठी या शेतकऱ्याने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंजाब सरकारप्रमाणे सरसकट नुकसानभरपाई मिळावी आणि तत्काळ कर्जमाफी जाहीर व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी १० ऑक्टोबरपासून कन्नड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांनी विनंती करूनही सेठी यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला. पालकमंत्री संजय शिरसाट जोपर्यंत उपोषणस्थळी येऊन आश्वासन देणार नाहीत, तोपर्यंत माघार नाही, अशी त्यांनी ठाम भूमिका घेतली. त्यानंतर तहसीलदारांनी पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून, शिरसाट यांना कन्नडला येणे शक्य नाही, उपोषणकर्त्यांनाच रुग्णवाहिकेतून इकडे छत्रपती संभाजीनगरला घरी घेऊन या, इथेच उपोषण सोडवू,' असा निरोप देण्यात आला.
त्यानुसार, रुग्णवाहिकेत संदीप सेठी, डॉक्टर आणि कार्यकर्ते, तसेच तहसीलदार व पोलिसांचा ताफा असे तीन वाहनांचे पथक शनिवारी रात्री पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास उपोषणकर्ते सेठी यांनी पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते ज्यूस पिऊन आपले उपोषण मागे घेतले. पालकमंत्र्यांनी यावेळी त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. या संपूर्ण घटनेमुळे पालकमंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यानंतर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय शिरसाट यांनी सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं.
"हा गैरसमज पसरवण्याचा प्रकार आहे. मी त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता मुंबईहून आलो. उपोषणकर्त्याचे वडील हे आमच्या पक्षाचे कार्यकर्ते होते. त्याने इच्छा व्यक्त केली माझ्याच हातातून उपोषण सोडायचं आहे. तिथे तहसीलदार होते. त्याने आग्रह केला तेव्हा तहसीलदाराने जाऊन येऊ असे म्हटलं. म्हणून ते इथे आले आणि त्यांचे कुटुंबिय तिथे होते. तासभर चर्चा झाली आणि त्याने उपोषण सोडलं. त्याने मागणी केली म्हणून त्याला बोलवण्यात आले. एखादा शेतकरी म्हटला त्याला पालकमंत्र्याला भेटायचं आहे तर त्याला नाही कसं म्हणता येईल. नऊ दिवस झाले होते. त्याला तातडीने आणणे गरजेचे होते. माझे आणि त्याच्यातील अंतर समांतर होते म्हणून बोलवलं. त्यामुळे यात वाद होण्याचे काही कारण नाही," असं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं.
"माझ्या पीएने सांगितले असं काही नाही. माझे सगळे कार्यक्रम होते. मला चूक झाली असं वाटत नाही. जे घडलं नाही त्यावर खेद कशाला व्यक्त करायचा. विरोधकांना टीका करु द्या. आम्ही काय मदत करतो हे आमच्या मनाला माहिती आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर सगळ्यात जास्त आम्ही आक्रमक असतो. शेतकऱ्यांसाठी काय करायला हवं ते आम्ही करतो," असंही संजय शिरसाट म्हणाले.