१७१ गावांभोवती ‘नायट्रेट’चा फास! युरियाचा अतिवापर घातक; जनतेच्या आरोग्याला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 08:49 IST2025-02-15T08:49:02+5:302025-02-15T08:49:11+5:30

खतांच्या वापरात जळगाव राज्यात अव्वल, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील १७१ गावांमधील २०५ विहिरी, कूपनलिकांसह जलस्रोतांच्या ठिकाणांवरून पाण्याचे नमुने घेतले.

Nitrates are a threat to 171 villages! Excessive use of urea is dangerous; a threat to public health | १७१ गावांभोवती ‘नायट्रेट’चा फास! युरियाचा अतिवापर घातक; जनतेच्या आरोग्याला धोका

१७१ गावांभोवती ‘नायट्रेट’चा फास! युरियाचा अतिवापर घातक; जनतेच्या आरोग्याला धोका

कुंदन पाटील

जळगाव : युरियाच्या अतिवापरामुळे जळगाव जिल्ह्यातील १७१ गावांमधील पाण्याच्या २०५ नमुन्यांमध्ये ‘नायट्रेट’चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहे. परिणामी या गावातील जनतेच्या आरोग्याभोवती ‘नायट्रेट’ने फास आवळला आहे. 

राज्यात सर्वाधिक रासायनिक खतांचा वापर जळगाव जिल्ह्यात होतो. वर्षाकाठी ५.५० लाख मेट्रिक टन खतांचा वापर होतो. मात्र, युरिया खताचा अतिरेक जमीन आणि पर्यावरणासाठी घातक ठरू लागला असल्याचे स्पष्ट होत आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने गेल्या वर्षी मान्सूनपूर्व व मान्सूनपश्चात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील १७१ गावांमधील २०५ विहिरी, कूपनलिकांसह जलस्रोतांच्या ठिकाणांवरून पाण्याचे नमुने घेतले.

‘नायट्रेट’चे प्रमाण किती?
पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे सुरक्षित प्रमाण प्रतिलिटर ४५ मिलिग्रॅमपेक्षा जास्त नसावे. मात्र, या अहवालानुसार या पाण्यात ६० ते ८० मिलिग्रॅम नायट्रेटचे प्रमाण असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

असे होते प्रदूषण
शेतातील पाण्यासोबत युरियाची अभिक्रिया होऊन त्यातून  ‘अमोनियम’ हे संयुग तयार होते. हे संयुग जमिनीत अस्थिर असते व नैसर्गिकरीत्या जमिनीमध्ये असणाऱ्या नायट्रोसोमोनास नावाच्या जिवाणूमुळे ‘नायट्राइट’ या घटकामध्ये रूपांतरित होते. यानंतर लगेचच नायट्रोबॅक्टर नावाच्या आणखी एका जिवाणूमुळे नायट्राइटचे रूपांतर ‘नायट्रेट’ या आयनामध्ये होते. 

सर्व पिके नत्र हे याच नायट्रेट स्वरूपात घेतात. म्हणजेच जेव्हा युरिया नायट्रेट स्वरूपात येतो तेव्हा पिकांची मुळे त्याला अन्न म्हणून शोषून घेतात. हा नायट्रेट घटक आयन स्वरूपात असल्यामुळे जमिनीमध्ये अतिशय जास्त चल स्वरूपात असतो. हा नायट्रेट जमिनीत पाण्यासोबत झिरपून जातो आणि जमिनीतील भूगर्भातील पाण्यामध्ये मिसळतो.  नाले, ओढा यांच्यामार्फत नद्यांमध्येदेखील मिसळतो. त्यातूनच पिण्याच्या पाण्यात नायट्रेटमुळे प्रदूषण होते.

जिल्ह्यातील विदारक परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘नॅनो युरिया’चा वापर करावा. नॅनो युरियामधील नत्राच्या अतिसूक्ष्म कणांमध्ये २० टक्के नत्र असते. नॅनो युरियातील कोणताही घटक पाणी, हवा किंवा जमिनीमध्ये मिसळत नाही. - पद्मनाभ म्हस्के, कृषी विकास अधिकारी, जि.प. जळगाव

आरोग्यावर काय परिणाम?
पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचा अंश अधिक प्रमाणात आढळून आल्यास असे पाणी लहान मुलांच्या, गर्भवती महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत गंभीर आजार निर्माण करू शकते. यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. तसेच या पाण्यापासून आरोग्यास धोका निर्माण होतो. असे पाणी पिणे योग्य नसते.

Web Title: Nitrates are a threat to 171 villages! Excessive use of urea is dangerous; a threat to public health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.