पैशाचे सोंग करता येत नाही: नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 14:26 IST2020-01-13T14:25:13+5:302020-01-13T14:26:09+5:30
कुठल्याही पक्षाचे सरकार येऊ द्या, त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीतच.

पैशाचे सोंग करता येत नाही: नितीन गडकरी
मुंबई : देशात आर्थिक मंदीचे ढग गडद होत असताना मंदीचा फटका विकास कामांनाही बसू लागला आहे. तर केंद्रसरकारकडे खर्च करण्यासाठी पैसे नसल्याचे खुद्द भाजपचे नेते आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे कबूल केले आहेत. औरंगाबादेत मासिआतर्फे आयोजित औद्योगिक प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी गडकरी बोलत होते.
कुठल्याही पक्षाचे सरकार येऊ द्या, त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीतच. तुम्ही सगळ्या गोष्टींची सोंगं करू शकतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही. त्यामुळे देशाचा विकास करायचा असेल तर 'पीपीपी'चा (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मार्ग स्वीकारावाच लागेल असे सुद्धा यावेळी गडकरी म्हणाले.
तसेच यावेळी शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज या इंडस्ट्रीयल रोडच्या कामाबद्दल बोलतानाही गडकरी म्हणाले की, या रोडबाबत दुसऱ्या टप्यात विचार करू, सद्या काही सांगू नका. तसेच आता नवीन काही करता येणार नाही.ज्या घोषणा केल्या ती कामे पूर्ण करू द्या, असेही गडकरी म्हणाले.
केंद्र शासनाच्या निधीतून एखादा मोठा प्रकल्प मंजूर केला तर कंत्राटदाराला काम सुरू करण्यासाठी मराठवाड्यातील खासदार, आमदार त्याला घरी बोलावतात. अगोदर आमचे ‘काम’कर मगच पुढे विकासकामाला सुरुवात कर, असा अजब आग्रह धरतात. त्यामुळे मराठवाड्यात कामासाठी आलेले कंत्राटदार अक्षरश: कामे सोडून पळून जात आहेत. ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे, अशी अपेक्षा गडकरी यांनी येथे व्यक्त केली.