लिव्ह इन रिलेशनशिप योग्य नाही, असे म्हणत केंद्रीय नितीन गडकरी यांनी या नातेसंबंधांना विरोध केला. लिव्ह इन रिलेशनशिपबद्दलचा ब्रिटन दौऱ्यातील अनुभवही नितीन गडकरी यांनी सांगितला. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केले.
मुलाखतीत नितीन गडकरी यांना लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल तुमचं मत काय आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना गडकरी म्हणाले, "लिव्ह इन रिलेशनशिप चुकीचं आहे. मी लंडनला गेलो होतो ब्रिटिनच्या संसदेत. पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांना भेटलो. त्यांनी मला विचारलं की, तुमच्या देशात सर्वात मोठी समस्या कोणती आहे?"
युरोपियन देशात ही समस्या झालीये -नितीन गडकरी
"मी त्यांना सांगितलं की, गरीब, भूकबळी, बेरोजगारी. तुमच्या देशात कोणती समस्या आहे? ते म्हणाले, 'आमची सगळ्यात मोठी समस्या ही आहे, युरोपियन देशांची की, बहुसंख्य तरुण आणि तरुणी लग्न करत नाहीये. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. त्याचा परिणाम असा होतोय की, त्यांची मुलं कशी होतील, त्यांचं भविष्य काय असेल?", असा प्रश्न नितीन गडकरींनी उपस्थित केला.
"तुम्ही सामाजिक जीवन पद्धती उद्ध्वस्त केली, तर कसं होईल. मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांची जबाबदारी आईवडिलांची असते. कुणी उद्या म्हणेल की आम्ही आमच्या आनंदासाठी मुलं जन्माला घातली आणि त्यांचं ते बघतील, असं नाही चालणार", असे गडकरी म्हणाले.
...तर उद्या दोन पत्नी करण्याची परवानगी द्यावी लागेल -गडकरी
"भारतात घटस्फोटांवर बंदी यायला हवी का? असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला. ते म्हणाले, "अजिबात नाही. पण, लिव्ह इन रिलेशनशिप योग्य नाही. त्याने समाज नष्ट होईल. हा समाज का टिकलेला आहे? कारण स्त्री पुरूष प्रमाण व्यवस्थित आहे. उद्या स्त्रियांची संख्या वाढली आणि त्या प्रमाणात पुरुषांची कमी झाली, तर उद्या तुम्हाला दोन पत्नी विवाह करण्याची परवानगी द्यावी लागेल", अशी भूमिका नितीन गडकरींनी मांडली.
"सामाजिक व्यवस्था चालवण्याचा नियम असतात. त्यांचं पालन केलं गेलं पाहिजे. मी एकदा अधिवेशनासाठी जातो होतो. वरच्या सीटवर बसलेल्या एका मुलाने आणि मुलीने जे करायचं नाही, ते करणं सुरू केलं. आमचे सर म्हणाले की, हे चांगलं नाही. हे करू नका. तर मुलगा म्हणाला की, आम्हाला जे वाटेल ते करू. आम्हाला अधिकार आहे. तुम्ही कोण आम्हाला सांगणारे? त्यावर सर म्हणाले की, आम्ही सांगणारे कोणी नाही पण आम्हालाही भावना आहेत. आजकाल तर तृतीयपंथीयांचेही लग्न होत आहे. मुलीचं-मुलीशी, मुलाचं मुलाशी लग्न होत आहेत. पण, समाज याने नष्ट होईल", असे मत नितीन गडकरी यांनी मांडले.