मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून नितीन गडकरी, गोयल निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 06:33 AM2019-05-25T06:33:41+5:302019-05-25T06:34:27+5:30

शिवसेना मागणार दोन मंत्रिपदे

Nitin Gadkari, Goyal fixed in the state of Modi's Cabinet | मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून नितीन गडकरी, गोयल निश्चित

मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून नितीन गडकरी, गोयल निश्चित

Next

मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार, याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. विद्यमान मंत्र्यांपैकी कोण कायम राहतील आणि कोणाला वगळले जाईल, याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहेत.


नितीन गडकरी, पीयूष गोयल आणि प्रकाश जावडेकर या विद्यमान कॅबिनेट मंत्र्यांचे स्थान नव्या मंत्रिमंडळात निश्चित मानले जात आहे. शिवसेनेकडून दोन कॅबिनेट मंत्रिपदे मागितली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.


भूपृष्ठ वाहतूक आणि जलसंपदामंत्री म्हणून गडकरी यांनी अनेक प्रकल्पांना गती दिली. त्यांच्यासह पीयूष गोयल यांचे अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून नाव घेतले जाते. मनुष्यबळ विकासमंत्री म्हणून जावडेकर यांच्या कामगिरीची प्रशंसा झाली आहे.
वाणिज्य, उद्योग आणि हवाई वाहतूक खात्याचे मंत्री सुरेश प्रभू राज्यसभा सदस्य आहेत आणि सुरुवातीला आपल्या मंत्रिमंडळाबाबत असलेला ‘लॅक आॅफ टॅलेंट’चा ठपका दूर करण्यासाठी मोदी यांनी ज्यांना मंत्रिपदाची संधी दिली, त्यात प्रभू यांचे नाव घेतले जात असे. प्रभू यांच्या कार्यक्षमतेबद्दल शंका नसली, तरी भाजपचे ३०३ खासदार लोकसभेत निवडून आलेले असताना आता प्रभू यांना पुन्हा संधी देताना उपयोगितेचा घटक लक्षात घेऊनच निर्णय होईल, असे मानले जाते.


मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यातून भाजपचे सहा तर शिवसेनेचे एक आणि रिपाइंचे रामदास आठवले असे एकूण आठ मंत्री होते. राज्यमंत्री भाजपचे हंसराज अहिर आणि कॅबिनेट मंत्री शिवसेनेचे अनंत गिते हे दोघेही पराभूत झाले आहेत. त्यामुळे दोन नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. भाजपकडून पूनम महाजन किंवा डॉ. हिना गावित यांच्या नावाची चर्चा आहे. चार महिन्यांनी महाराष्ट्रात होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनही मंत्रीपदे दिली जातील.


शिवसेनेने यापूर्वी केंद्रात दोन कॅबिनेट मंत्रीपदे मागितली होती. अनंत गिते कॅबिनेट मंत्री झाले पण नंतर अनिल देसाई यांना राज्यमंत्रीपद दिले जाणार असल्याचे स्पष्ट होताच त्यांना शपथ घेऊ न देता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना माघारी बोलविले होते. उद्धव ठाकरे हे उद्या दिल्लीत जाण्याची शक्यता असून मंत्रीपदांबाबत ते पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करतील, अशी शक्यता आहे.

Web Title: Nitin Gadkari, Goyal fixed in the state of Modi's Cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.