Maharashtra Election 2019: कणकवलीत अटीतटीची लढत! नितेश राणे पुन्हा मिळवणार का विजय? 

By वैभव देसाई | Published: October 4, 2019 03:47 PM2019-10-04T15:47:04+5:302019-10-04T15:54:55+5:30

नितेश राणेंच्या भाजपा उमेदवारीमुळे तळकोकणातील राजकारणात वेगळीच रंगत आली

Nitesh Rane BJP Candidate Kankavli seat in Maharashtra | Maharashtra Election 2019: कणकवलीत अटीतटीची लढत! नितेश राणे पुन्हा मिळवणार का विजय? 

Maharashtra Election 2019: कणकवलीत अटीतटीची लढत! नितेश राणे पुन्हा मिळवणार का विजय? 

googlenewsNext

- वैभव देसाई
गेल्या अनेक दिवसांपासून भाजपात जाण्यास उत्सुक असलेल्या नारायण राणेंचा पक्ष प्रवेश कधी होणार, याचीच कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिलेली होती. राणेंचा पक्ष प्रवेश झाला नसला तरी राणेंचे पुत्र नितेश राणेंना भाजपानं कणकवलीतून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकूणच तळकोकणातील राजकारणात वेगळीच रंगत आली आहे. भाजपाच्या प्रमोद जठार यांनी माघार घेत आमदारकीसाठी नितेश राणेंचं नाव पुढे केल्याचं कणकवलीतल्या पत्रकार परिषदेत भाजपा नेते अतुल काळसेकरांनी सांगितलं. एकंदरीतच भाजपानं टाकलेल्या या गुगलीनं कणकवली मतदारसंघातून इच्छुक असलेले संदेश पारकर आणि अतुल रावराणे यांच्या पायाखालची जमीनच सरकली. नितेश राणेंना भाजपाकडून एबी फॉर्म मिळाल्यानं ते भाजपाचेच अधिकृत उमेदवार असल्याचं निश्चित झालं आहे. तर दुसरीकडे भाजपाने कणकवलीतून नितेश राणेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने मतदारसंघातील भाजपाचे निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते त्यांच्याविरोधात एकवटल्याचे चित्र आहे.

भाजप नेतृत्वाच्या निर्णयाविरोधातच 'या' कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा फडकावत नितेश राणेंच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार देण्याचा निर्धार केला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत नितेश राणेंचे काम करणार नसल्याची भूमिका या जुन्या भाजपा कार्यकर्त्यांनी घेतली आहे. खरं तर गेल्या पाच वर्षांत नितेश राणेंनी कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्यांनी जोडलेला मतदारसंघ पिंजून काढला आहे. या तिन्ही तालुक्यांतील गावागावात भेटीगाठी घेऊन त्यांनी जनतेच्या विकासाची कामं केली आहे, मग स्वखर्चातून दिलेल्या बोअरवेल असो किंवा रस्त्यांसाठी निधी, अशी कामं करून अनेक गावांमध्ये त्यांनी जनतेचा आशीर्वाद मिळवलेला आहे. तसेच त्यांच्या विरोधात कणकवली मतदारसंघात म्हणावा तसा तगडा उमेदवार नाही. संदेश पारकर असो किंवा अतुल रावराणे यांचं कार्यक्षेत्र मर्यादित आहे. कणकवली तालुका सोडल्यास इतर दोन तालुक्यांत त्यांनाही फारसा जनाधार नाही.


राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा तळकोकणात पसरलेला आहे. सिंधुदुर्गातल्या अनेक ग्रामपंचायतीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची सत्ता आहे. नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष भाजपामध्ये विलीन केल्यानंतर ती सर्व ताकद भाजपाला मिळणार आहे. त्यामुळे साहजिकच कोकणातील भाजपाचं वजन वाढणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे भाजपामध्ये जाणार अशा चर्चा आहेत. नारायण राणेंना पक्षात घेऊन भाजपा त्यांचा शिवसेनेविरोधात अस्त्रासारखाच वापर करणार आहे. भाजपानं राज्यभरात अनेक ठिकाणी ताकद वाढवली असली तरी कोकणात भाजपाला शिवसेनेमुळे ताकद वाढवता आलेली नाही. कोकणात होऊ घातलेल्या प्रकल्पांसाठी भाजपाला तिथे आपले आमदार हवे आहेत, प्रत्येक वेळी शिवसेनेच्या दबावापुढे झुकणं भाजपाच्या फारसं पचनी पडत नाही. परंतु अपरिहार्यता म्हणून शिवसेनेबरोबर युती करून राज्यातील सत्तेचा गाडा भाजपाला हाकावा लागतो आहे. नितेश राणेंना भाजपाकडून मिळालेली उमेदवारी शिवसेनेलाही आवडलेली नाही. त्यातच राणेंचे एकेकाळचे जुने सहकारी असलेले सतीश सावंतही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी मातोश्रीचे उंबरे झिजवत उमेदवारी मिळवलेली आहे.

शिवसेनेकडून कणकवली मतदारसंघातून इच्छुक असलेल्या सतीश सावंत यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. कणकवली मतदारसंघात आमदार नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेनं उमेदवार दिल्यानं राज्यभरात हा पॅटर्न राबवला जाण्याची भीती आहे. त्यामुळे आता भाजपाही शिवसेनेच्या विद्यमान आमदार आणि वजनदार नेत्यांविरोधात उमेदवार देण्याची शक्यता नाकारता येत नाही, एकंदरीतच सतीश सावंतांना एबी फॉर्म दिल्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच कोकणात शिवसेनेनं नितेश राणेंच्या विरोधात उमेदवार दिल्यानं युती फक्त कागदावरच शिल्लक राहिल्याचं चित्र निर्माण झालं आहे, त्यामुळे कणकवलीचा गड नितेश राणे राखतात की शिवसेना हा मतदारसंघ त्यांच्याकडून हिसकावून घेते हे निकालानंतरच समजणार आहे.

Web Title: Nitesh Rane BJP Candidate Kankavli seat in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.