अहिल्यानगर जिल्ह्यामधील मढी गावात होणाऱ्या कानिफनाथ जत्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यास मनाई करण्याचा ठराव गावातील ग्रामपंचायतीने केल्याने वादाला तोंड फुटले आहे. विविध स्थरातून या निर्णयाचा निषेध करण्यात आल्यानंतर बीडीओंनी या ठरावाला स्थगिती दिली होती. मात्र भाजपा आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी आज मढी येथे झालेल्या सभेतून ग्रामपंचायतीच्या निर्णयाला पाठिंबा देतानाच या ठरावाला स्थगिती देणाऱ्या बीडीओंना इशारा दिला आहे. तसेच हिंदू धर्माला आव्हान देण्याचं काम केलं तर मढी गावाने घेतला तसा निर्णय महाराष्ट्रभर घेतला जाईल, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.
आज मढी गावात झालेल्या हिंदू धर्मसभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना नितेश राणे यांनी आक्रमक आणि चिथावणीखोर भाषण केले. ते म्हणाले की,मढी गावातील ग्रामपंचायतीने जो निर्णय घेतला आहे तो इतिहासामध्ये लिहिला जाणार आहे. या गावातील कडवट विचारांचे हिंदू जागृत झाले आहेत. तसेच या गावाने घेतलेला निर्णय देशाला दिशा देणारा आहे. हिंदू धर्माला आव्हान देण्याचं काम केलं तर मढी गावाने घेतला तसा निर्णय महाराष्ट्रभर घेतला जाईल, असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.
यावेळी ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांनाही नितेश राणे यांनी इशारा दिला आहे. गटविकास अधिकाऱ्यांना कळू दे की हे हिंदुत्ववादी सरकार आहे. मढी गावातील ग्रामपंचायतीने केलेला ठराव रद्द झाला असला तरी तुम्ही पुन्हा ठराव करा. तसेच सर्व ग्रामस्थांनी या ठरावावर सह्या करा. ग्रामस्थांनी या ठरावावर सह्या केल्या की, बीडीओ ठराव कसा रद्द करतात हे मी पाहतो, अशी ताकीद नितेश राणे यांनी दिली.
दरम्यान, मढी ग्रामपंचायतीने केलेला ठराव सकृतदर्शनी घटनाबाह्य असल्याचे दिसते. याबाबत चौकशी समिती नेमली आहे. ग्रामसेवक, सरपंच, ठरावाचे सूचक, अनुमोदक व ग्रामसभेतील उपस्थित लोकांचे जबाब समिती नोंदवील. ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल पाठविला जाईल, असे पाथर्डी येथील गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.