दीक्षाभूमीवर अवतरला निळा जनसागर
By Admin | Updated: October 15, 2014 01:40 IST2014-10-15T01:40:52+5:302014-10-15T01:40:52+5:30
१४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवारी तब्बल दोन लाखावर निळा जनसागर

दीक्षाभूमीवर अवतरला निळा जनसागर
जयभीमच्या घोषणांनी निनादला परिसर
नागपूर : १४ आॅक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवारी तब्बल दोन लाखावर निळा जनसागर दीक्षाभूमीवर अवतरला होता. यावेळी जयभीमच्या घोषणांनी परिसर निनादला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमीच्या दिवशी १४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्या दिवशी दसरा होता. त्यामुळे दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षेचा सोहळा दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी आयोजित केला जातो. त्या दिवशी देश-विदेशातून बौद्ध, आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. नागपुरातील उपासक-उपासिका त्यांच्या सेवेत असतात. त्यामुळे नागपूर व आजूबाजूच्या परिसरातील बौद्ध उपासक-उपासिका १४ आॅक्टोबर रोजी धम्मदीक्षेचा सोहळा साजरा करीत असतात. गेल्या ५७ वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.
आज बुधवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिकांनी गर्दी केली. मध्यवर्ती स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. हातात पंचशीलेचे ध्वज घेऊन जयभीमच्या घोषणांनी तरुणाईने परिसर निनादला होता.
गोव्याच्या परेश परवार यांनी घेतली बुद्ध धम्माची दीक्षा
गोवा येथील परेश ऊर्फ पांडुरंग परवार या तरुणाने आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. भंते सुगत बोधी यांनी परेश यांना बुद्ध धम्माची दीक्षा दिली.
परेश हे गोवा येथील पेडणे तालुक्यातील इब्रामपूर या गावचे रहिवासी आहेत. ते राज्य शासनाच्या नियोजन विभागामध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत. ते मागासवर्गीय समाजाचे असून त्यांच्या कुटुंबामध्ये बुद्ध धम्माची दीक्षा घेणारे ते पहिले आहेत. वयाच्या १४ व्या वर्षांपासून त्यांना बाबासाहेब समजू लागले. तेव्हापासून ते आंबेडकरी चळवळीत कार्य करीत आहे. कुटुंबातील कुणीही बौद्ध नसल्याची खंत त्याच्या मनाला नेहमी बोचत असे. कुटुंबात पत्नी व दोन मुलं आहेत. नागपुरातील बीएसएनएलचे डिव्हिजनल इंजिनियर बाबा लखोटे हे काही काळ गोव्यात नोकरीला होते. त्यावेळी त्यांच्याशी परवार यांचा संपर्क झाला. त्यांच्या प्रेरणेतून यावर्षी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचे त्यांनी निश्चित केले. १४ तारखेला कुटुंबासह दीक्षा घेण्याची त्यांची योजना होती. परंतु मुलीची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना आणता येणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी बुधवारी एकट्यानेच दीक्षा घेतली. (प्रतिनिधी)