बुलेट ट्रेन स्थानकासाठी घाई; एनएचएसआरसीएलने निविदा मागविल्या, प्रकल्पाला मिळणार गती
By नारायण जाधव | Updated: July 23, 2022 06:25 IST2022-07-23T06:24:37+5:302022-07-23T06:25:17+5:30
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने आतापर्यंत राज्यात रखडलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणखी गती दिली आहे.

बुलेट ट्रेन स्थानकासाठी घाई; एनएचएसआरसीएलने निविदा मागविल्या, प्रकल्पाला मिळणार गती
नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी जाताच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने आतापर्यंत राज्यात रखडलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणखी गती दिली आहे. गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत बीकेसीतील जागा त्वरित रिकामी करण्याचे आदेश दिल्यानंतर आता तेथे मुंबईतील पहिले स्थानक बांधण्यासह पालघर जिल्ह्यातील वसई ते पालघर आणि डहाणू ते तलासरी दरम्यानच्या मार्गातील वृक्षछाटणी, त्यांची वाहतूक, तोडलेल्या वृक्षांचा लिलाव करण्यासह काहींचे पुनर्राेपण करण्याच्या कामाची प्रक्रिया एनएचएसआरसीएल अर्थात नॅशनल हायस्पीड रेल काॅर्पोरेशनने शुक्रवारी सुरू केली.
यातील पहिला टप्पा म्हणजे मुंबईत बीकेसीतील ४.८२ हेक्टरच्या भूखंडावर जे स्थानक बांधण्यात येणार आहे, त्यात सहा फलाट राहणार असून, त्यांची लांबी १६ कोच मावतील इतकी राहणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातील बोगदा खोदण्यासाठीची निविदा शुक्रवारी सुरू केली. हा बोगदा स्थानकाचाच एक भाग आहे.
मुंबई ते शीळदरम्यानच्या २१ किमी टनेलशी त्याचा काहीही संबंध नाही, असे बुलेट ट्रेनच्या प्रवक्त्या सुषमा गौर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याशिवाय बुलेट ट्रेनचा मार्ग ज्या भागातून जाणार आहे, त्या पालघर जिल्ह्यातील वसई ते पालघर आणि डहाणू ते तलासरी दरम्यान मार्गातील वृक्षछाटणी, त्यांची वाहतूक, तोडलेल्या वृक्षांचा लिलाव करण्यासह काही वृक्षांचे पुनर्राेपण करण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया नॅशनल हायस्पीड बुलेट ट्रेन काॅर्पोरेशनने केली आहे.
मात्र, या मार्गात नक्की किती झाडे जाणार हे आताच सांगता येणार नसल्याचे गौर म्हणाल्या. दरम्यान, बुलेट ट्रेनसाठी बीकेसीत जे टनेल खोदण्यात येणार आहे, त्यासाठी कोट्यवधींचा खर्च होणार आहे, यासाठीची अनामत रक्कमच ४१ कोटी आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानंतर आठवड्यातच निविदा
गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत बीकेसीतील कोविड सेंटर ताबडतोब हटवून हा भूखंड विनाविलंब एनएचएसआरसीएलकडे हस्तांतरित करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एमएमआरडीएला दिले होते. त्यानंतर आठवडाभरातच बुलेट ट्रेनच्या या स्थानकासाठी एनएचएसआरसीएलने निविदा मागविल्याने मोदी सरकारसाठी हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे, याची झलक महाराष्ट्राला दिसली आहे.
वृक्षांची छाटणी करून लिलाव
- पालघर जिल्ह्यातील वसई ते पालघर आणि डहाणू ते तलासरी दरम्यान मार्गातील वृक्षछाटणी, त्यांची वाहतूक, तोडलेल्या वृक्षांच्या लिलावासाठी दोन टप्प्यांत हायस्पीड काॅर्पोरेशनने निविदा मागविल्या आहेत.
- यातील पहिला टप्पा वसई ते पालघर आणि दुसरा टप्पा डहाणू ते तलासरी, असा आहे. याच भागातून तुंगारेश्वर अभयारण्यासह पालघर जिल्ह्यातील खारफुटीचे जंगल मोठ्या प्रमाणात बाधित होणार आहे.
- महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाने बुलेट ट्रेन प्रकल्पाची राज्यातील आखणी कशी असावी, मार्गिका कोठून न्यावी आणि पोहोच मार्ग कसे असावेत, याबाबत आता सामान्य जनतेकडून ज्या हरकती आणि सूचना मागविल्या होत्या, त्याची मुदत उद्याच संपत आहे.