राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला पुढील आठवड्याचा मुहूर्त! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यक्रमात व्यग्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 05:32 IST2022-07-23T05:30:42+5:302022-07-23T05:32:24+5:30
आता २५ जुलैनंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला पुढील आठवड्याचा मुहूर्त! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यक्रमात व्यग्र
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही. पुढील तीन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई बाहेरचे व्यग्र कार्यक्रम लक्षात घेता, आता पुढच्या आठवड्यातच विस्तार होण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे शुक्रवारी दुपारनंतर दिल्लीला रवाना झाले. मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ आयोजित समारंभ व स्नेहभोजनाला दोघेही उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी ते विस्ताराबाबत चर्चा करतील, असे म्हटले जात होते. मात्र, अशी कोणतीही भेट ठरली नसल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची एक दिवसाची बैठक २३ जुलै रोजी पनवेल येथे होणार आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यासह भाजपचे राज्यातील सर्व ज्येष्ठ नेते तेथे असतील. २४ जुलै रोजी भाजप व मित्रपक्षांच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बैठक गृह मंत्री अमित शहा यांनी दिल्लीत बोलविली आहे. त्या बैठकीला शिंदे-फडणवीस हे दोघेही उपस्थित राहतील.
२५ जुलै रोजी नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी आणि त्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजन असे कार्यक्रम दिल्लीत आहेत. त्यावेळी शिंदे-फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आता २५ जुलैनंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता आहे.
अधिवेशन लांबणीवर
मंत्रिमंडळ विस्तार लटकल्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनही लांबणीवर पडले आहे. २५ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू होणार होते. विस्तार झाल्यानंतर नव्या मंत्र्यांना खात्याची माहिती घेण्यासाठी किमान एक आठवड्याचा कालावधी लागेल. त्यामुळे नव्या मंत्र्यांना त्यांच्या खात्यांची पूर्ण माहिती घ्यावी लागणार आहे.