नरहरी झिरवाळ प्रकरणाला नवं वळण! व्हायरल व्हिडिओतील 'ती' व्यक्ती समोर आली; पहिला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:07 IST2026-03-31T16:05:14+5:302026-03-31T16:07:32+5:30

हा व्हिडिओ २-३ व्हिडिओ एकत्रित करून एडिट करण्याचा आरोप झिरवाळांनी केला. मात्र हा व्हिडिओ खरा की खोटा याबाबत अद्याप खुलासा समोर आला नाही.

New twist in Narhari Jirwal case! Pawan Yadav person in viral video comes to light; FIR registered | नरहरी झिरवाळ प्रकरणाला नवं वळण! व्हायरल व्हिडिओतील 'ती' व्यक्ती समोर आली; पहिला गुन्हा दाखल

नरहरी झिरवाळ प्रकरणाला नवं वळण! व्हायरल व्हिडिओतील 'ती' व्यक्ती समोर आली; पहिला गुन्हा दाखल

मुंबई - राज्यात भोंदूबाबा खरातचे प्रकरण ताजे असतानाच मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओतील तृतीयपंथी व्यक्तीने समोर येत मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

या व्हिडिओतील तृतीयपंथी पवन यादव याच्या तक्रारीनंतर कफ परेड पोलीस ठाण्याने त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवला आहे. त्याशिवाय व्हायरल व्हिडिओ एडिट केल्याचाही आरोप आहे. अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरीला लाव नाहीतर व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकी पवन यादवला दिली होती. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप पवन यादवने त्याच्या भावाविरोधात केला. 

भावाने आपल्याला ब्लॅकमेल केले, मूळ व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. पवन यादवने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी BNS कलम ७९,३५१(१) आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत पवन यादवचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. हा व्हिडिओ २-३ व्हिडिओ एकत्रित करून एडिट करण्याचा आरोप झिरवाळांनी केला. मात्र हा व्हिडिओ खरा की खोटा याबाबत अद्याप खुलासा समोर आला नाही.

दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली होती. नरहरी झिरवाळ यांनी मला फोन करुन हा व्हिडीओ तीन ते चार व्हिडीओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार केला गेला आहे. त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी तात्काळ यासंदर्भात एक तक्रार दाखल करावी असा सल्ला मी त्यांना दिला. या व्हिडीओची शहानिशा करण्यात येईल आणि जी परिस्थिती निर्माण झालीय त्याची सत्यता पडताळून त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार आणि आम्ही मिळून एकत्र निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. 

Web Title: New twist in Narhari Jirwal case! Pawan Yadav person in viral video comes to light; FIR registered