कधीच जातिभेद केला नाही, सर्वांच्या प्रश्नांसाठी लढणार! मनोज जरांगे-पाटील यांचे विधान
By राजकुमार जोंधळे | Updated: March 11, 2026 00:20 IST2026-03-11T00:13:37+5:302026-03-11T00:20:29+5:30
Manoj Jarange Patil News: ‘माझ्याकडे धनगर, मुस्लीम, दलित अथवा इतर कोणत्याही समाजातील व्यक्ती आली, तरी मी कधीच जातिवाद केला नाही. मराठा आरक्षणासोबतच समाजाचे दैनंदिन प्रश्न सोडवणे, ही आमची जबाबदारी आहे. मला फक्त एक वर्ष द्या, तुमचे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ अशी ग्वाही मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी येथे दिली.

कधीच जातिभेद केला नाही, सर्वांच्या प्रश्नांसाठी लढणार! मनोज जरांगे-पाटील यांचे विधान
- राजकुमार जाेंधळे
निलंगा/औराद शहाजानी (जि. लातूर) - ‘माझ्याकडे धनगर, मुस्लीम, दलित अथवा इतर कोणत्याही समाजातील व्यक्ती आली, तरी मी कधीच जातिवाद केला नाही. मराठा आरक्षणासोबतच समाजाचे दैनंदिन प्रश्न सोडवणे, ही आमची जबाबदारी आहे. मला फक्त एक वर्ष द्या, तुमचे सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ अशी ग्वाही मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी येथे दिली.
निलंगा तालुक्यातील माकणी (थोर) येथील श्री हनुमान आराधना कार्यक्रमानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. जरांगे-पाटील म्हणाले, मराठा समाजातील गोरगरिबांची मुले मोठ्या पदावर जावीत, हाच माझा ध्यास आहे. जोपर्यंत ‘सगेसोयरे’नुसार पूर्ण आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील. ‘हा राजकीय मंच नसून आध्यात्मिक मंच आहे. येथील हनुमान आराधनेचा प्रसाद आणि श्रद्धा मला भविष्यातील आंदोलनासाठी नक्कीच बळ देईल,’ असेही ते म्हणाले.
प्रारंभी गावातून मारुती मंदिरापर्यंत मनोज जरांगे-पाटील यांची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लातूर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. एका बाजूला भक्तिमय वातावरण आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक चळवळीचे केंद्रबिंदू असलेल्या जरांगे-पाटील यांची उपस्थिती, यामुळे माकणीत उत्साहाचे वातावरण होते.
माकणी येथील हनुमान आराधना गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. येथे शनिवारी आणि मंगळवारी भाविक आपली इच्छापूर्ती करण्यासाठी महाप्रसाद (आराधना) घालतात. या आराधनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, सर्व जाती-धर्माचे लोक एकाच पंक्तीत बसून भाकर, वेसर, सपक डाळ, भात या भोजनाचा आस्वाद घेतात. सामाजिक समतेचा हा वारसा पाहून जरांगे-पाटील यांनी समाधान व्यक्त केले.