'नीट' अर्जासाठी सर्व्हरचा खोडा; हजारो विद्यार्थ्यांची ओढाताण, मुदतवाढ मिळणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:07 IST2026-03-09T12:07:39+5:302026-03-09T12:07:56+5:30
हजारो विद्यार्थी वेटिंगवर, प्राध्यापकांना तारीख वाढवून मिळण्याची अपेक्षा

'नीट' अर्जासाठी सर्व्हरचा खोडा; हजारो विद्यार्थ्यांची ओढाताण, मुदतवाढ मिळणार का?
- हणमंत गायकवाड
लातूर : वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'नीट' परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे; मात्र गेल्या चार दिवसांपासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संकेतस्थळाचा वेग मंदावल्याने आणि वारंवार साइट बंद पडत असल्याने विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापक कमालीचे त्रस्त झाले आहेत. ८ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असतानाही अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म प्रलंबित आहेत. आता तारीख वाढवून मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.
नीट परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ८ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. सुरुवातीला सर्व सुरळीत चालले, मात्र ५ मार्चपासून अचानक साइटमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाले. एक अर्ज भरण्यासाठी तासन्तास वाट पाहावी लागत असून, अडीच ते तीन तासांचा वेळ एका फॉर्मसाठी खर्ची पडत आहे. लातूर शहर हे शिक्षणाचे माहेरघर असल्याने येथून दरवर्षी हजारो विद्यार्थी नीट परीक्षेला बसतात; मात्र यंदा साइटच्या खेळखंडोबामुळे विद्यार्थी मानसिक दडपणाखाली आहेत.
बोर्डाची परीक्षा अन् नीटचा अर्ज : दुहेरी कात्रीत विद्यार्थी
सध्या राज्य मंडळाच्या १२ वीच्या परीक्षा सुरू आहेत. एकीकडे बोर्डाच्या पेपर्सची तयारी आणि दुसरीकडे 'नीट'चा फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफेमध्ये घालवावा लागणारा वेळ यामुळे विद्यार्थ्यांची मोठी ओढाताण होत आहे. व्यावसायिक केंद्र चालकांकडेही अर्जांचा डोंगर साचला असून दिवसभरात केवळ १० ते १२ फॉर्म भरणे शक्य होत असल्याचे चित्र आहे.
तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे?
गेल्या तीन दिवसांपासून साइट व्यवस्थित चालत नाहीये. अनेक विद्यार्थी अर्जापासून वंचित राहिल्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नक्कीच मुदतवाढ मिळेल, अशी आम्हाला आशा आहे.
— प्रा. विनोद झरीटाकळीकर, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर.
तारीख वाढवून द्यावी
साइट बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. बोर्डाच्या परीक्षेत व्यग्र असताना ही अतिरिक्त डोकेदुखी ठरत आहे. 'नाटा'ने याची दखल घेऊन तारीख वाढवून द्यावी.
— भाऊसाहेब सरवदे, उपप्राचार्य, दयानंद विज्ञान महाविद्यालय.
प्रलंबित अर्जांची संख्या मोठी
सर्व्हरचा प्रश्न ५ मार्चपासून गंभीर झाला आहे. लातूरमधील विद्यार्थ्यांचा ओढा ‘नीट’कडे मोठा असल्याने प्रलंबित अर्जांची संख्या मोठी आहे. ही वस्तुस्थिती प्रशासनाने लक्षात घेणे गरजेचे आहे.
— सचिन बांगड, समुपदेशक.
थोडक्यात महत्त्वाचे...!
शेवटची तारीख : ८ मार्च २०२६
समस्या: ५ मार्चपासून संकेतस्थळ चालत नाही.
मागणी : तांत्रिक अडचणींमुळे मुदतवाढ मिळावी.
आता सर्वांचे लक्ष 'एनटीए'च्या अधिकृत निर्णयाकडे लागले असून, विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.