Sunil Tatkare News: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन्मदिवसानिमित्त दिनांक २२ ते ३० जुलै दरम्यान 'जनविश्वास सप्ताह' म्हणून राज्यभर साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या 'जनविश्वास सप्ताहा'मध्ये तालुका, जिल्हा, गाव पातळीवर रक्तदान शिबिरे, ज्येष्ठ नागरिक व महिलांची आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करणे, पर्यावरणाबाबतीत अजितदादा पवार संवेदनशील असल्याने वृक्षारोपण अभियान हरित महाराष्ट्र किंवा झाड माझी; सावली झाड माझी माऊली, या थीमअंतर्गत गाव, तालुका, जिल्हा स्तरावर वृक्षारोपणाची मोहिम राबवली जाणार आहे. युवा संकल्प शिबीर घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रेरणा देणे व सर्वंकष माहिती देणे, तरुण पिढी सक्रिय व सजग झाली पाहिजे असा प्रयत्न असणार आहे. ही युवा शिबीरे विभागीय किंवा शहरात त्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर यांचा समावेश आहे. महिला सक्षमीकरणासाठी मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.
शिक्षण, सक्षमीकरण, स्वयंरोजगार, सूक्ष्म कर्ज, कौशल्य प्रशिक्षण यावर चर्चा व अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार देणे आदी, राष्ट्रवादी काँग्रेस विचार मंथन सभा यामध्ये पक्षाची विचारधारा ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारावर सुरु आहे. याचे बौद्धिक सक्षमीकरण केले जाणार आहे. अजितदादा विकास प्रदर्शन अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक विकास प्रकल्पांचा आढावा आणि लोकांपर्यंत प्रसार केला जाणार आहे. राष्ट्रवादी संवाद यात्रा यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जनसंपर्क वाढविण्यासाठी राज्यभरातील ग्रामीण आणि शहरी भागात संवाद यात्रा काढण्यात येणार असून यामध्ये गावागावात चौपाल आयोजित करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे व पक्षाच्या धोरणांचा प्रसार करण्यात येणार आहे अशी संपूर्ण कार्यक्रमाची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली.