“फडणवीसांचे मन मोठे, १०५ आमदार असताना CM पद दुसऱ्याला द्यायला तयार”; सुप्रिया सुळेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 18:05 IST2023-10-10T18:02:13+5:302023-10-10T18:05:24+5:30
Supriya Sule: पक्ष आणि पक्षचिन्ह आम्हालाच मिळणार, असा विश्वास सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला.

“फडणवीसांचे मन मोठे, १०५ आमदार असताना CM पद दुसऱ्याला द्यायला तयार”; सुप्रिया सुळेंचा टोला
Supriya Sule: आताच्या घडीला राज्यात सत्ताधारी असो वा विरोधक असो, मुख्यमंत्री पदावरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात असल्याचे पाहायला मिळत आहेत. सत्तेत सहभागी होऊन १०० दिवस झाल्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले. यावर प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
मीडियाशी बोलताना, अजित पवार मुख्यमंत्री झाले, तर सर्वात जास्त आनंद मलाच होईल. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना माझी एक अट असेल, की अजितदादांना पहिला हार मला घालू द्यावा, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस किती मोठ्या मनाचे आहेत, भाऊ मोठा कसा असावा, तो देवेंद्रजींसारखा असावा. १०५ आमदार असतानाही दुसऱ्याला मुख्यमंत्रिपद द्यायची त्यांची तयारी आहे, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.
अजितदादांनी देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपद देऊ नये
अजितदादांना माझी एवढीच विनंती राहील, की तू जेव्हा मुख्यमंत्री होशील, तेव्हा गृहमंत्रीपद दुसरे कोणालाही दे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना ते देऊ नको. तरच राज्यातील आमचे हेरंब कुलकर्णी यांच्यासारखे भाऊ सुरक्षित राहतील, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच मला न्यायालयावर आणि निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे. मात्र, तो पेपर फुटला आहे का? काही गोलमाल आहे का? दिल्लीची अदृश्य शक्ती ही काहीतरी गडबड करेल, अशी शंका सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पक्ष आम्हालाच मिळणार आहे. चिन्ह आम्हालाच मिळणार आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्वांनाच माहिती आहे, की राष्ट्रवादी पक्ष कोणी स्थापन केला आहे, असेही सुप्रिया सुळेंनी नमूद केले.