वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या गंभीर आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने कठोर भूमिका घेत राजेंद्र हागवणे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या घरात घडलेल्या संतापजनक प्रकारावर पक्षाने तीव्र निषेध केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे. "माणसं सैतानासारखी एवढी निर्दयी कशी वागू शकतात?" असं म्हटलं आहे. तसेच "या प्रकारचे घृणास्पद कृत्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मग ती कुणीही असो कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे. वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे" असंही सांगितलं.
"अमानुषपणे मारहाण झाली"
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. "वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण मनाला अतिशय यातना देणारे आणि तितकेच चीड आणणारे आहे. माणसं सैतानासारखी एवढी निर्दयी कशी वागू शकतात,असा प्रश्न पडतो. तिच्या मृतदेहावरील मारहाणीचे व्रण पाहता तिची हत्या की आत्महत्या याचा निष्पक्ष तपास होणे गरजेचे आहे. तिला अमानुषपणे मारहाण झाली, हे स्पष्टपणे दिसून येत आहे."
"माणुसकीला काळीमा फासणारी घटना"
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून पीडित मुलगी आणि कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. या महाराष्ट्राच्या भूमीत आजच्या काळात देखील हुंडाबळी घडत असेल तर अशा घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत. या प्रकारचे घृणास्पद कृत्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मग ती कुणीही असो कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे. वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.