“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 14:47 IST2025-12-12T14:46:45+5:302025-12-12T14:47:07+5:30
Supriya Sule Post: खासदार सुप्रिया सुळे यांनी वडील शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.

“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
Supriya Sule Post: राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने देशभरातील राजकीय नेते आणि अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे आयोजित केलेले स्नेहभोजन चर्चेत आहे. या स्नेहभोजनाला अजित पवार यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत असतानाच, काँग्रेस नेते राहुल गांधी व उद्योजक गौतम अदानी हे या वेळी समोरासमोर आल्याचे म्हटले जात आहे. यातच वडील शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लेक खासदार सुप्रिया सुळे यांनी विशेष पोस्ट शेअर केली आहे.
शरद पवार यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमाला अजित पवार आणि प्रफुल पटेल हेही उपस्थित होते. यादरम्यान, संसदेच्या दालनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पवार कुटुंबीयांचा हा सोहळा एकत्रितपणे उत्साहात झाला असला तरी, राजकीयदृष्ट्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येण्याचा मुद्दा मात्र अजून गुलदस्त्यात राहिला आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची सातत्याने चर्चा होत असली तरी हे मनोमीलन एवढ्यात होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जाते.
श्रमलेल्या बापासाठी लेक...
खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. “श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!”, अशा ओळी सुप्रिया सुळे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिल्या आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी सगळ्या कुटुंबाचा फोटोही शेअर केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक्सवर एक पोस्ट करत शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा!, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी;
— Supriya Sule (@supriya_sule) December 12, 2025
लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!! pic.twitter.com/r1U4NxaVVZ