“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:20 IST2025-07-04T14:19:31+5:302025-07-04T14:20:31+5:30
NCP SP Group MP Supriya Sule News: बाळासाहेब ठाकरे यांचे देशासाठी आणि राज्यासाठी योगदान राहिलेले आहे. कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
NCP SP Group MP Supriya Sule News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणाला वेग येताना दिसत आहे. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेससुप्रिया सुळे यांनी हिंजवडी येथे रस्त्याची पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.
पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, विकासकामांमध्ये कुठलेही राजकारण करणार नाही. सरकारने या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हिंजवडीतील प्रश्नांबाबत वारंवार वेळ मागितली आहे. पत्रव्यवहार केलेला आहे. हिंजवडीचा विकास झाला पाहिजे, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही
५ जुलै रोजी ठाकरे बंधूंच्या मुंबईतील विजयी मेळावा होणार आहे. अनेक वर्षांनी ठाकरे बंधू एकाच मंचावर येत असल्याने या कार्यक्रमाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यश आणि अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. ठाकरे हे केवळ आडनाव नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे देशासाठी आणि राज्यासाठी योगदान राहिलेले आहे. जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा याचा उल्लेख होईल. मोठ्या विश्वासाने आणि शून्यातून त्यांनी शिवसेना उभी केलेली आहे. ठाकरे ब्रँड कुणीही संपवू शकत नाही. कुठलीही ताकद संपवू शकणार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर त्यांचे मनापासून स्वागत करते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मराठीच्या मुद्द्यावर ०५ जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्र येऊन विजयी मेळावा घेत आहेत, यात तुमचा पक्ष सहभागी असणार का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना, ठाकरे बंधूंच्या मेळाव्याबाबत माहिती नाही. आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे काल मला भेटले होते. ते म्हणाले होते की, या सगळ्या कामात आम्ही सहभागी होणार आहोत. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांचा निर्णय हा आम्हाला शिरसावंद्य असतो, असे शरद पवार यांनी सांगितले. तुम्ही या मेळाव्याला जाणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर शरद पवार यांनी नकारात्मक उत्तर दिले. नाही. मी त्या मेळाव्याला जाणार नाही. माझे कार्यक्रम दुसरीकडे आहेत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.