“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 07:53 IST2025-11-06T07:51:11+5:302025-11-06T07:53:35+5:30
NCP SP Group MP Supriya Sule News: महाविकास आघाडीसह मनसेने निवडणूक आयोगासमोर काही मतचोरीचे पुरावे सादर केले होते. पण समोरून काही उत्तर आले नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
NCP SP Group MP Supriya Sule News: महाविकास आघाडीसह मनसे पक्षाने निवडणूक आयोगासमोर काही मतचोरीचे पुरावे सादर केले होते. मात्र आमच्या पदरात काहीच पडले नाही. समोरून काही उत्तर आले नाही. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी हरियाणात एका तरुणीने तब्बल २२ वेळा मतदान केल्याचा खुलासा केला. मात्र, निवडणूक आयोग यावर काहीच बोलायला तयार नाही. निवडणूक आयोगावर दबाव असण्याची शक्यता आहे. दुबार मतदानाचे पुरावे सादर करूनही निवडणूक आयोग कोणतीच कारवाई करत नाही. कोणत्याही चौकशी विना क्लिनचीट दिली जाते. याचा अर्थ या सर्वाचे निवडणूक आयोग समर्थन करत आहे, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत हरियाणात एका तरुणीने तब्बल २२ वेळा मतदान केल्याचा धक्कादायक दावा केला. हा मुद्याचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगावर मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना हल्लाबोल केला. आमचा पहिला प्रस्ताव आणि आमची इच्छा आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढावे. जिथे शक्य असेल तिथे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार त्याला आम्ही प्राधान्य देऊ. पुढे स्थानिक नेते त्यांच्या फिडबॅक काय येतो. त्याप्रमाणे नियोजन करून पुढच्या आठ दिवसात चित्र स्पष्ट होईल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारला ७ वर्षे घाई झाली नाही
खरेतर ही निवडणूक घेण्यात काही अर्थ नाही. कारण दुर्देव आहे की, एका सशक्त लोकशाहीचा ज्याचा सार्थ अभिमान आपल्या प्रत्येक भारतीयाला आहे, तिथे मतदार याद्यांमध्ये एवढा घोळ होतो, तो दुरूस्त करा. तंत्रज्ञान एवढे बदलले आहे की, ते आपले आयुष्य चांगले आणि सोपे करते. त्यामुळे महिना, पंधरा दिवसात, दोन महिन्यात मतदार याद्यांमधील घोळ नीट करून जानेवारीमध्ये निवडणुका घेता येऊ शकत होत्या. काहीच घाई नव्हती. एवढी घाई का झाली. या महाराष्ट्र सरकारला ७ वर्षे घाई झाली नाही. एकदम असे काय झाले जितकी आरोपाला धार वाढत गेली तेवढी निवडणुकीची घाई झाली, अशी शंका सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केली.
स्थानिक नेत्यांचे म्हणणे ऐकून स्वबळाचा नारा
आम्ही जरी विरोधक असलो तरी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीतीसाठी एक विशेष सेशन बोलवा. चर्चा करू. महाराष्ट्राच्या हितासाठी कधीतरी महाराष्ट्राच्या मुख्यमत्र्यांनी मतभेद सोडून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र या. जसे ऑपरेशन सिंदूरसाठी आम्ही देशाच्या हितासाठी सगळे एक झालो तशी महाराष्ट्राला आता गरज आहे. जिथे शक्य असेल तिथे आम्ही आघाडी म्हणून लढणार आहे. स्थानिक नेत्यांचे म्हणणे ऐकून स्वबळाचा नारा देण्यात येईल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न आहेत, महाराष्ट्र प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीतून चालला आहे. हा केंद्र सरकारचा डेटा आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. पुण्यासारख्या शहरात भरदिवसा काल क्रूर पद्धतीने हत्या झाली. हे पहिलेच प्रकरण नाही. मग पुण्याच्या कायदे सुव्यवस्थेवर कधी चर्चा होणार? महाराष्ट्रात गुन्हेगारी, गरिबी, बेरोजगारी आणि महागाई वाढलेली आहे. शेतकऱ्यांची दर तीन तासाला एक आत्महत्या होते, हा मकरंद आबा पाटलांचा डेटा आहे, जो त्यांनी विधानसभेत मांडला आहे. मग ही परिस्थिती असेल तर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार का नाही बोलत आहे? असा संतप्त सवालही सुप्रिया सुळे यांनी केला.