NCP SP Group Uttam Jankar To Meet Raj Thackeray: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल अनेकार्थाने धक्कादायक होते. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले, तर महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक आकडा गाठणेही कठीण झाले. या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही अधिक चर्चा होती. परंतु, मनसेची एकही जागा निवडून आली नाही. निवडणुकीनंतर अधिक समोर न आलेल्या राज ठाकरे यांनी आता आपली भूमिका मांडली आहे. वरळी येथे मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला.
विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रभर सन्नाटा पसरला. लोकांनाच हा निर्णय कळला नाही, पचला नाही. माझ्याकडे संघ परिवाराशी संबंधित एक व्यक्ती आली होती, ते म्हणाले 'इतना सन्नाटा क्यो है भाई, कोई तो जिता होगा... कोणीतरी जिंकलं ना मग जल्लोष का नाही? काही काही गोष्टींवर विश्वासच बसू शकत नाही. भाजपाला १३२ जागा मिळाल्या, मागील वेळी १०५ मिळाल्या होत्या. २०१४ साली १२२ जागा होत्या. भाजपाचं समजू शकतो, पण अजित पवारांना ४२ जागा कुणाचा तरी विश्वास बसेल का? त्याशिवाय जे इतके वर्ष राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावर हे लोकं मोठे झाले त्या शरद पवारांना फक्त १० जागा मिळतात. या सर्व न समजण्यासारख्या गोष्टी आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.
उत्तम जानकर घेणार राज ठाकरेंची भेट
उत्तम जानकर यांनी ईव्हीएमबाबत अनेक दावे आणि आरोप केले आहेत. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची आग्रही मागणीही करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम फॅक्टर आहे, तो हेराफेरी करणारा आहे. त्यामुळे विधानसभेचा निकाल अनपेक्षित लागला. पुढील आठवड्यात राज ठाकरे यांना भेटणार आहे. राज ठाकरे यांना माझ्याकडील पुरावे दाखवले तर ते आणखीन या लढईत ताकतीने उतरतील, असा विश्वास उत्तम जानकर यांनी व्यक्त केला. तसेच ईव्हीएमबाबतच्या लढ्यामुळे राज ठाकरेंना त्यांचा पक्ष मजबुतीने उभा करण्यास मदत होईल. ईव्हीएमच्या लढ्यात राज ठाकरेंचे स्वागत करतो, असे उत्तम जानकर म्हणाले. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जाणार असून, बॅलेट पेपरच्या मुद्द्यावरती राजीनामा द्यायला तयार आहे. माझ्या मतदारसंघाची निवडणूक बॅलेट पेपर वर घ्या, हे मी सभापती आणि राज्य सरकारलाही सांगत आहे. निवडणुकीतील पारदर्शकता आणल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार जानकर यांनी बोलून दाखवला.
दरम्यान, मारकडवाडी संदर्भात राज ठाकरेंची भेट घेणार आहे. मारकडवाडी प्रकरणासंदर्भात माझ्याकडे अनेक पुरावे आहेत ते मी इलेक्शन कमिशनलाही दिले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला चिठ्ठी पडण्याची वेळ वेगळी होती. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ज्या कक्षात सीसीटीव्ही लावले आहे. त्यातील पाच कक्षाचे सीसीटीव्ही देण्याची मागणी केली आहे. मारकडवाडी प्रकरणातील जनतेचा आक्रोश निवडणूक आयोगाला जाणून घेता आला नाही. ईव्हीएमबाबत राज ठाकरे, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, अरविंद केजरीवाल यांना माहिती आहे, असेही उत्तम जानकर यांनी नमूद केले.