‘President Of Bharat’? शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांना अस्वस्थता...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 14:24 IST2023-09-05T14:23:07+5:302023-09-05T14:24:55+5:30
संविधानातून भारतासाठी वापरण्यात येणारा इंडिया हा शब्द हटवण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरु असल्याची चर्चेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.

‘President Of Bharat’? शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांना अस्वस्थता...”
INDIA Name: केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात वन नेशन, वन इलेक्शन यासह अन्य महत्त्वाची विधेयके सादर होऊ शकतात, अशी चर्चा आहे. यातच आता केंद्र सरकारने संविधानातून इंडिया हा शब्द हटवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. यावरून आता विरोधकांकडून केंद्र सरकावर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
संसदेच्या विशेष अधिवेशनाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसं राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. सरकारने अचानक बोलावलेल्या विशेष अधिवेशनात नेमके काय होणार याची कुणालाही कल्पना नाही. यातच काँग्रेस जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये जी-२० संमेलनासाठी ज्यांना डिनरसाठी निमंत्रित केले आहे ज्यात प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे, असा दावा केला आहे. यावर शरद पवार यांनी भाष्य केले आहे.
कोणीही नाव हटवू शकत नाही
इंडिया काय किंवा भारत काय मला त्यावर वाद घालायचा नाही. मला तशी काही माहिती नाही. मल्लिकार्जून खर्गे यांनी एक बैठक बोलावली आहे. इंडिया बैठकीत सहभागी झालेले पक्ष आहेत त्यांच्या प्रमुखांची बैठक आहे. या बैठकीत या गोष्टींचा विचार होईल. पण, हे नाव हटवण्याचा आधिकार कोणालाही नाही. कोणीही नाव हटवू शकत नाही, देशाशी निगडीत असलेले नावांबाबत अस्वस्थता सत्ताधारी पक्षांना का असते हे मला समजते नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रपती भवनात ९ सप्टेंबरवर जी-२० संमेलनाच्या डिनरसाठी निमंत्रण पत्रिका पाठवली आहे. त्यात प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख आहे. जर संविधानाचे कलम १ वाचले तर त्यात भारत जो इंडिया आहे एका राज्यांचा संघ असेल. आता संघराज्याला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.