NCP News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वाढत चाललेल्या भेटी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे बंधू हे काही निमित्त मात्र एकत्र येणार की, महापालिका निवडणुकीत युती करणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. त्यापूर्वीच मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीची निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रित लढवित आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्यावरूनही अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. यावर आता पुतण्यांनी काकांना एक ऑफर दिल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे.
राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. मोठ्या संख्येने आमदार अजित पवारांसोबत गेले. लोकसभा निवडणुकीत अपयश आले, तरी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने मोठी मुसंडी मारली. अजित पवार पुन्हा उपमुख्ममंत्री झाले. अजित पवारांसोबत जे आमदार गेले, ते आता सत्तेत असून, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आणखी काही नेते त्यांची साथ सोडताना पाहायला मिळत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी याबाबत मोठे विधान केले आहे.
...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात
मीडियाशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, तुम्हाला एकच सांगतो की, आम्ही भाजपाच्या विरोधात आहोत. भाजपाच्या विचारसरणीच्या विरोधात आहोत. त्यामुळे जर अजित पवारांनी भाजपाची साथ सोडली आणि शरद पवार यांच्यासोबत पुरोगामी विचारासोबत ते आले, तर त्यावेळेस आम्ही विचार करू. पण, अजित पवार जर भाजपासोबत असतील तर आम्ही एकत्रित येऊच शकत नाही. भाजपाला त्यांनी सोडले, तर सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण काय करायचे तो विचार केला जाईल आणि निर्णय घेतला जाईल, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राहुल गांधींनी उघडपणे पुराव्यानिशी मतांची चोरी झाल्याचे सांगितले. आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत, टप्प्याटप्प्याने समोर येणार आहोत. मतांची चोरी म्हणजेच लोकशाहीची चोरी आहे. लोकशाहीची चोरी होत असेल तर, गरिबांना न्याय देता येणार नाही. निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना अनेक प्रलोभन दिले. कर्जमाफी असो, बोनस असो, त्यात अजूनही त्यांनी शेतकऱ्यांना मदत दिलेली नाही. आश्वासने पाळली गेलेली नाहीत. आमच्यासोबत जे आहेत ते संपूर्ण निष्ठावान आहेत. त्यामुळे येत्या काळात यश नक्कीच येणार, अशा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.