Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली तर मैदानात जागा पुरणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 13:57 IST2022-10-03T13:55:49+5:302022-10-03T13:57:30+5:30
Maharashtra News: उद्धव ठाकरेंच्या शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात स्वत:हून लोक येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली तर मैदानात जागा पुरणार नाही”
Maharashtra Politics: आताच्या घडीला अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष्य शिंदे गट (Eknath Shinde Group) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या दसरा मेळाव्याकडे (Dasara Melava) लागले आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीनंतर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदान म्हणजेच शिवतीर्थावर होणार हे निश्चित झाले. तर एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावर मेळावा घेणार आहेत. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये शक्तिप्रदर्शनाची चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसने ताकद लावली, तर मैदान पुरणार नाही, असे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत मिळत असल्याचा दावा भाजपने केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, राष्ट्रवादीने मेळाव्यासाठी ताकद लावली तर मैदानात जागा पुरणार नाही. पण राष्ट्रवादीला ताकद लावण्याची गरजच काय, अशी उलट विचारणा रोहित पवार यांनी केली आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला बसेसमधून लोकं आणली जातील. पण शिवतीर्थावर होणाऱ्या मेळाव्यात स्वत:हून लोक येतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
माझ्या दोघांच्याही दसरा मेळाव्याला शुभेच्छा आहेत
शिवसेनेचीच ताकद एवढी आहे की, त्यांच्या कार्यकर्त्यांमुळेच मैदानात जागा पुरणार नाही. स्वतःच्या हिंमतीवर ते ताकद लावून सभा घेतील. माझ्या दोघांच्याही दसरा मेळाव्याला शुभेच्छा आहेत. दोघांचाही मेळावा मोठा व्हावा. मात्र त्यानंतर लोकांच्या हिताची कामे व्हायला हवीत. लोकांचे प्रश्न सुटावीत अशी आशा नागरिक म्हणून मी व्यक्त करतो, असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर बोलताना, जेव्हा होईल तेव्हा बघूया. तो त्यांच्या जिल्ह्याचा प्रश्न आहे, राज्याचा नाही. कदाचित लोकांचे मन विचलित व्हावे यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले असेल. त्यात काही तथ्य नसावे. या चर्चाच आहे. इतक्या चर्चा होतील की आपण थकून जाऊ, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"