“नक्की काय चाललंय हेच माहिती नाही,” महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 17:10 IST2022-06-21T17:08:12+5:302022-06-21T17:10:16+5:30
राज्यात विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे.

“नक्की काय चाललंय हेच माहिती नाही,” महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
राज्यात विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य सुरू झालं आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही आमदार सूरतमध्ये पोहोचलेत. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे त्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या सर्वावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“नक्की काय चाललंय हेच माहित नाही. त्यामुळे संध्याकाळपर्यंत सर्वकाही परिस्थिती स्पष्ट होईल तेव्हा पाहू,” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, योग्य वेळी पर्याय देऊ असं भाजपचे लोक म्हणत आहेत, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी उत्तर देत ही शहाणपणाची गोष्ट असल्याचं म्हटलं.
एकनाथ शिंदे सूरतमध्ये
सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलबाहेर आता गुजरात पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सूरत हा भाजपाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबईहून रात्री दहा शिवसेनेचे आमदार सूरतकडे रवाना झाले. रात्री दीडला एकनाथ शिंदे काही आमदारांसह सूरतकडे रवाना झाले.