Ajit Pawar on Raj Thackeray: “बोलणं सोपं, प्रक्षोभक भाषणाने रोजीरोटीचे प्रश्न मिटणार का”; अजितदादांचा राज ठाकरेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 14:36 IST2022-04-06T14:35:07+5:302022-04-06T14:36:06+5:30
Ajit Pawar on Raj Thackeray: राज ठाकरेंचे नगरसेवकदेखील सहमत नसून कोणाला तरी बरे वाटावे म्हणून भाषणे करतायत, अशी टीका अजित पवारांनी केली.

Ajit Pawar on Raj Thackeray: “बोलणं सोपं, प्रक्षोभक भाषणाने रोजीरोटीचे प्रश्न मिटणार का”; अजितदादांचा राज ठाकरेंना सवाल
शिर्डी: मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या भाषणाचे पडसाद अजूनही राजकारणात उमटत आहेत. राजकीय स्तरातून राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया येत आहेत. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्याने यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत चिथावणीखोर भाषणे करून रोजीरोटीचा प्रश्न मिटणार आहे का, असा थेट सवाल केला आहे.
शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन आणि नुतन इमारत उद्घाटन कार्यक्रमाला अजित पवार यांनी हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा समाचार घेतला. भाषण करणे सोपे आहे, पण अशी भडकाऊ भाषणे करुन रोजीरोटीचे प्रश्न मिटणार आहेत का, अशी विचारणा अजित पवार यांनी यावेळी राज ठाकरे यांना उद्देशून केली.
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाषण करतात
काही लोक जातीय तेढ निर्माण करणारे भाषण करतात. भोंगे लावायला सांगतात. त्यांचे नगरसेवक देखील सहमत नाहीत. कोणाला तरी बरे वाटावे, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाषण करतात, अशा शब्दांत अजित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकरवर हनुमान चालिसा लावा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे, असे राज ठाकरे यांनी नमूद केले होते.
दरम्यान, राज्यात वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्ताने आंदोलने केली जात आहेत. संघर्ष निर्माण केले जात आहेत. राजकारण म्हणून आंदोलन केली जातात. त्रिपुरामधील घटनेचे पडसाद मालेगांव, अमरावतीमध्ये उमटतात, आंदोलन केली जातात. पोलिसांना सहकार्य करण्याऐवजी अशांतता निर्माण केली जाते. समाजात तेढ निर्माण केला जाते. सर्वत्र असे सुरु आहे. आता अजान आणि हनुमान चालीसावरुन वाद सुरु आहे. प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळाव्यात, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याच कार्यक्रमात म्हटले.