महाविकास आघाडीत राष्ट्रवादी करतेय शिवसेनेवर कुरघोडी; सेनेचे २ खासदार नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 04:22 PM2022-05-29T16:22:38+5:302022-05-29T16:23:14+5:30

ज्या-ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम आहे. त्या-त्या ठिकाणी शिवसेनेचे खच्चीकरण होत आहे असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला.

NCP does not give funds to Shiv Sena, MP Shrikant Shinde, Sanjay Jadhav displeased | महाविकास आघाडीत राष्ट्रवादी करतेय शिवसेनेवर कुरघोडी; सेनेचे २ खासदार नाराज

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी करतेय शिवसेनेवर कुरघोडी; सेनेचे २ खासदार नाराज

Next

कऱ्हाड : राज्यात महाविकास आघाडी सरकार आकाराला येताना काही सूत्र ठरले होते. मात्र सातारा जिल्ह्यात ते पाळले जात नाही. राष्ट्रवादीचे पालकमंत्री शिवसेनेला दाबण्याचे काम करत आहे, ही बाब चुकीची आहे. आघाडी धर्माचे पालन सर्वांनीच करायला हवे,’ असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

खासदार शिंदे शिवसंपर्क अभियानानिमित्त सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील, माजी जिल्हा प्रमुख हर्षद कदम, नितीन काशिद, शशिराज करपे, शशिकांत हापसे यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.

खासदार शिंदे म्हणाले, ‘ज्या-ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम आहे. त्या-त्या ठिकाणी शिवसेनेचे खच्चीकरण होत आहे. शिवसंपर्क अभियानादरम्यान निधी वाटपाबाबत होत असलेला दुटप्पीपणा निदर्शनास आला असून, त्याची गांभीर्याने दखल घेतली जाणार आहे.’ शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने राज्यभर दौरा सुरू आहे. या दौऱ्यात राज्यभरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी विविध ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी वाटपात अन्याय होत असल्याचे सांगितले. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामध्ये पदांप्रमाणे निधी वाटपामध्येही समसमान वाटप होणे अपेक्षित होते. मात्र, तसे होत नाही. ही बाब योग्य नसून या संपर्क दौऱ्याचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात शिवसंपर्क अभियान सुरू आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. जिल्ह्यात काही महिन्यांच्या काळात पक्षाच्या निष्ठावान पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे निधन झाल्याने शिवसेनेची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे या दौऱ्याच्या माध्यमातून याठिकाणी जुन्या व नवीन कार्यकर्त्यांची मोट बांधून पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत....

राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागला आहे. याबाबत राजकारण केले जात आहे. परंतु ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, ही शिवसेनेचीही भूमिका असून डेटा कलेक्ट करण्याचे काम सुरू आहे.

पुण्यातही नाराजी

पुण्यातही शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असूनही कार्यकर्त्यांना हवं तसे पाठबळ मिळत नाही. निधीवाटपात शिवसेनेवर अन्याय केला जातो. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सर्व ती मदत पुरवली जाते. मात्र शिवसैनिकांना डावललं जाते. आमचा मित्रपक्ष आमची ठोकतोय असं त्यांनी म्हटलं होतं. 
 

Web Title: NCP does not give funds to Shiv Sena, MP Shrikant Shinde, Sanjay Jadhav displeased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.