“जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, कोणत्या जातीचे किती लोक हे एकदा कळू द्यावे”: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 19:55 IST2023-10-02T19:53:28+5:302023-10-02T19:55:23+5:30
Sharad Pawar News: एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी जातिनिहाय जनगणनेबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

“जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, कोणत्या जातीचे किती लोक हे एकदा कळू द्यावे”: शरद पवार
Sharad Pawar News: बिहारच्या राजकारणात कळीचा मुद्दा ठरलेल्या जातिनिहाय जनगणनेची आकडेवारी समोर आली आहे. यानंतर आता विविध राज्यांतून जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे, याबाबतची मागणी जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, असे ठाम मत व्यक्त केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी जातिनिहाय जनगणनेबाबत प्रतिक्रिया दिली.
कोणता समाज किती टक्के आहे? याबद्दलची माहिती मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कोणत्या जातीचे किती लोक आहेत, हे एकदा लोकांना कळू द्यावे. त्याचे चित्र पुढे ठेवल्यानंतर जो सगळ्यात दुबळा आहे. त्याच्यासाठी देशाची, राज्याची शक्ती वापरण्याची ख-या अर्थाने आवश्यकता आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
पाणी, जंगल, जमीन या सगळ्याचा आदिवासी मालक आहे
आदिवासींना वनवासी म्हटले जाते. आदिवासी या देशातील संस्कृतीचा घटक आहे. पाणी, जंगल, जमीन या सगळ्याचा आदिवासी मालक आहे. त्यांना तुम्ही या मार्गाने जा, पूजा अर्चा करा अशा प्रकारची भूमिका सांगितली जाते. ही भूमिका मान्य नसल्याचे आदिवासी तरुणांनी शिवनेरीच्या पायथ्याशी माझ्यापुढे मांडली आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भटक्या विमुक्तांचे प्रश्न अनेक असून आजचे राजकर्ते या प्रश्नांबाबत किती जाणकार, जागरुक आहेत. प्रश्नांची सोडवणूक करण्याची भावना त्यांच्या अंतकरणामध्ये कितपत आहे. याबद्दल शंका व्यक्त करावी अशी स्थिती आहे. एकेकाळी सोलापूर, बारामतीत भटक्या समाजातील घटकांना गुन्हेगार ठरवून त्यांना तारांच्या कुंपणात ठेवले जात होते. स्वातंत्र्याच्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी सोलापूरमध्ये जाऊन कुंपनाच्या तारा तोडल्या. आमच्याकडे सत्ता असताना जाणीवपूर्वक सवलती दिल्या. आजही फार मोठा वर्ग एका वेगळ्या स्थितीत राहत आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. पण, त्यासाठी राज्यकर्त्यांची मानसिकता बदलली पाहिजे, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले.