“...त्यामुळेच एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचारासाठी गेले, मुख्यमंत्रीपद भाजपच्या...”: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 21:16 IST2023-05-09T21:15:56+5:302023-05-09T21:16:40+5:30
Sharad Pawar News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचारासाठी का गेले, यावर शरद पवार यांनी सूचक शब्दांत भाष्य केले.

“...त्यामुळेच एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचारासाठी गेले, मुख्यमंत्रीपद भाजपच्या...”: शरद पवार
Sharad Pawar News: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होत आहे. तत्पूर्वी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला होता. महाराष्ट्रासह देशभरातील भाजपचे मुख्यमंत्री, नेते, पदाधिकारी कर्नाटकात तळ ठोकून होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही कर्नाटकात प्रचाराला गेले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना यामागील राजकारण काय ते सांगितले.
कर्नाटकात प्रचारावेळी ‘बजरंग बली की जय’ अशी घोषणा देऊन मते द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. मीडियाशी बोलताना शरद पवार म्हणाले की, जेव्हा आम्ही निवडणुकीचा अर्ज भरतो. तसेच, निवडून आल्यावर राज्यपाल, सभापती आणि लोकांच्यासमोर आमचा लोकशाही, धर्मनिपेक्षतेवर विश्वास आहे, अशी शपथ घेतो. पण, धर्माच्या आणि जातीच्या नावाने मते मागणे त्या शपथेचा भंग आहे. देशाचे पंतप्रधान या प्रकारची भूमिका देशासमोर मांडतात, याची मला गंमत वाटते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
...त्यामुळेच एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचारासाठी गेले
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचारासाठी गेले होते. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपत आदेश देण्याची संस्कृती आहे. एकनाथ शिंदेंना ती मान्य करावीच लागते. केंद्रातून जो आदेश येतो, तो बिचाऱ्या शिंदेंना पाळावा लागतो. शिंदेंचं मुख्यमंत्रीपद भाजपाच्या आमदारांवर आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे कर्नाटकात प्रचारासाठी गेले, अशी खोचक प्रतिक्रिया शरद पवार यांनी केले.
दरम्यान, सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत आहे. याचा अर्थ या सरकारला लोकांना सामोरे जायला भीती वाटते, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.