NCP AP Group Sunil Tatkare News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून विरोधकांनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावरून दोन्ही गटातील नेत्यांमध्ये अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. यातच आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी सुनेत्रा पवार पुढाकार घेणार का? या प्रश्नांवर सुनील तटकरे यांनी सविस्तर उत्तरे दिली.
पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही एनडीएमध्ये आहोत. भाजपाप्रणीत एनडीए आहे. एनडीएमध्ये भाजपासोबत सत्तेत आहोत. महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सत्तेत आहोत. देश गतिमान करण्यासाठी सत्तेत आहोत. ही भूमिका अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतली होती आणि ती सामूहिकरित्या पुढे नेण्यासाठी आमचे सर्वांचे कर्तव्य आहे. भाजपाप्रणीत एनडीएमध्ये येण्यासंदर्भात भूमिका ज्यांना सोबत यायचे आहे, त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका पूर्वीपासून ठरली आहे. निवडणुकीला सामोरे गेलो. यश मिळाले, असे तटकरे यांनी सांगितले.
दोन्ही NCP एकत्र येण्यासाठी आता सुनेत्रा पवार पुढाकार घेणार?
दोन्ही NCP एकत्र येण्यासाठी आता सुनेत्रा पवार पुढाकार घेणार, अशा आशयाचा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, अजितदादा असल्यापासून आम्ही एनडीएमध्ये आहोत. म्हणजे भाजपासोबत सत्तेत आहोत. या निर्णयाला जे अनुकूल आहेत, त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे, असे तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी एका गटाकडून कट शिजवला जात आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर, विजय वडेट्टीवार काय बोलतात, त्यापेक्षा चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर करावा. काँग्रेस अंतर्गत पळवापळवी करणाऱ्या विजय वडेट्टीवारांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेसचा महापौर कोणत्या गटाचा होणार? याची काळजी त्यांनी घ्यावी. नंतर आमच्याकडे पाहावे, असा पलटवार तटकरे यांनी केला.
उपमुख्यंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर सुनेत्रा वहिनी नतमस्तक होण्यासाठी आल्या
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रिती संगमावरील समाधी स्थळावर उपमुख्यंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर सुनेत्रा वहिनी नतमस्तक होण्यासाठी आल्या. चव्हाण साहेबांचे विचार घेऊन आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अडीच वर्ष वाटचाल केली. चव्हाण साहेबांचा विचारांचा वारसा आणि दादांनी आम्हाला दिलेला विचार हे पुढे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सुरू ठेवण्याच्या कर्तव्याच्या भावनेतून वहिनी या ठिकाणी आल्या. नतमस्तक झाल्या. उद्याच्या महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी पूर्णपणाने योगदान वहिनींकडून उपमुख्यमंत्री या नात्याने मिळेल, असा विश्वास आहे, असे तटकरे म्हणाले.
दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत शरद पवार यांनी भाष्य केले. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, विलीनीकरणाबाबत श्रद्धेय शरद पवार यांनी जी प्रतिक्रिया दिली, त्यावर मी बोलणार नाही. इतरांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, त्या बारामतीत अंत्यसंस्कार सुरू होण्यापूर्वीच सुरू झालेले. विलीनीकरण कुठल्या पक्षाचे कुठल्या पक्षात? जर कळले तर नक्की बोलता येईल. तसेच संजय राऊत काय म्हणाले, त्याला फार महत्त्व द्यायचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने दादांच्या नेतृत्वाखाली निर्धारपूर्वक एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राज्यातील १३ कोटी जनतेने विधानसभेला त्यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे एनडीएमधील आमची सोबत जाण्याची भूमिका त्या ठिकाणी अधोरेखित आहे. प्रत्येक जण आपपल्या परिने टिका टिप्पणी करत असतो, असे तटकरे म्हणाले.
Web Summary : Amidst NCP reunion talks, Sunil Tatkare clarifies the party's NDA alliance under Ajit Pawar's leadership. He emphasizes commitment to Maharashtra's development, dismissing Congress criticisms and highlighting Sunetra Pawar's dedication to the state's future following her oath.
Web Summary : एनसीपी पुनर्मिलन की चर्चा के बीच, सुनील तटकरे ने अजित पवार के नेतृत्व में पार्टी के एनडीए गठबंधन को स्पष्ट किया। उन्होंने महाराष्ट्र के विकास के प्रति प्रतिबद्धता पर जोर दिया, कांग्रेस की आलोचनाओं को खारिज किया और सुनेत्रा पवार के शपथ के बाद राज्य के भविष्य के प्रति समर्पण को उजागर किया।