NCP AP Group Minister Narhari Zirwal News: महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार यांवरून अनेक आमदारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. तर अद्याप काही मंत्र्यांनी आपल्या विभागाच्या मंत्रिपदाचा पदभारही स्वीकारलेला नाही. यातच आता पालकमंत्री पदावरूनही महायुतीत मानापमान नाट्य रंगू शकते, असे कयास बांधला जात आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांनी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायला आवडेल, याबाबत मनातील इच्छा बोलून दाखवली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनीही कोणकोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायला आवडेल, याबाबत मन की बात बोलून दाखवली.
मला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यासाठी लोकांचा आग्रह आहे. पण मी सांगितले आहे की, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद नको. कारण पुणे, नाशिक हे नागपूरच्याही खूप पुढे विकासाच्या बाबतीत आहेत. विकासाच्या बाबतीत नाशिक तर एक नंबरला आहे. तसेच नाशिक जिल्हा आर्थिक सक्षम आहे. त्यामुळे मागणी केली आहे की, मला एक किंवा दोन छोटे-छोटे जिल्हे द्या. मात्र, आदिवासी जिल्हे द्या, असे नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे.
मी आदिवासी आहे म्हणून...
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते की, मला गोंदिया जिल्ह्याला घेऊन जायचे आहे. गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. आता गडचिरोली जिल्ह्यासाठी भरपूर लोकांची मागणी आहे. मात्र, या दोन ते चार जिल्ह्यापैकी मागणी केलेली आहे. तसेच पालघर द्या, ठाणे द्या, नंदुरबार द्या, कोणताही जिल्हा द्या, पण आदिवासींचा जिल्हा द्या. मी आदिवासी आहे म्हणून नाही. पण मी समाजाचे काहीतरी देणे लागतो, ते देणे त्यानिमित्ताने परत करण्याची संधी मिळेल, असे झिरवाळ यांनी नमूद केले.
दरम्यान, राज्यातील पालकमंत्रिपदाची नावे लवकरच जाहीर होणार असल्याची चर्चा सुरू असून, त्यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा सुरू झाली आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी दादा भुसे आणि गिरीश महाजन यांच्यात चुरस आहे. नाशिकमधून दादा भुसे आणि छगन भुजबळ यांच्यात पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा होईल, असा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा अंदाज होता. मात्र, भुजबळ यांना धक्कादायकरीत्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांचा समावेश झाल्यानंतर कोकाटे आणि भुसे यांच्यात स्पर्धा सुरू झाली, असे सांगितले जात आहे.