Sunil Tatkare News: वरिष्ठ पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची कसलीच चर्चा नसल्याने असे विलिनीकरण वगैरे कोसो दूर आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसच्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही. पण, असा काही निर्णय करायचा झाला तरी त्याबाबत भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विचारावे लागेल. भाजपाच्या नेत्यांनी आम्हाला विचारपूर्वक स्वीकारले आहे. त्यामुळे विलिनीकरणाचे काही निर्णय घ्यायचे झाल्यास त्याची कल्पनाही भाजपाच्या नेत्यांना द्यावी लागेल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
सुनील तटकरे पत्रकारांशी बोलत होते. गेल्या काही दिवसा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नेत्यांचा आमच्या बरोबरचा व्यवहार पूर्वीच्या आघाडीपेक्षा सौहार्दपूर्ण होता. १९९९च्या विधानसभेतमध्ये कॉग्रेसबरोबर आम्ही अगदी थेट लढलो होतो. भाजपाचे नेतृत्त्व जेव्हा वाजपेयी यांच्या हाती होते, तेव्हाही राष्ट्रवादीला भाजपाबरोबर जाता आले असते. पण तसे केले नाही. आता मात्र अधिवेशनात ठराव घेऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुनील तटकरे यांनी नमूद केले.
जनसुरक्षा कायद्याला पाठिंबा
राष्ट्रवादी कॉग्रेसचे विचार शरद पवार यांच्या विचारसरणीवर अवलंबून असतील तर त्यांनी जनसुरक्षा कायद्याला विरोध असल्याचे म्हटले आहे आणि सत्तेतील पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेस जनसुरक्षा कायद्याच्या बाजूने आहे, या विरोधाभासाविषयी तटकरे यांना विचारले असता ते म्हणाले, सत्तेतील पक्ष आहे. आणि विधिमंडळात या कायद्याचे पूर्ण वाचन झालेले आहे. त्यामुळे या कायद्याला पाठिंबा आहे. शरद पवार यांच्या विचारांना नाकारणे असा याचा अर्थ काढता येणार नाही, असेही सुनील तटकरे म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी आम्ही एनडीएबरोबर राहणार, हे अधोरेखित केले होते. ज्यांना आमची ही भूमिका मान्य आहे, ते आमच्यासोबत राहू शकतात. अजित पवार मुख्यमंत्री बनण्याच्या प्रश्नावर सुनील म्हणाले की, आम्ही वास्तववादी आहोत. अनेकदा ज्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांच्या वाट्यालाही महत्त्वाचे पद येते. त्यामुळे आम्ही आशावादी आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळे लढणार की महायुती म्हणून लढणार, यावर सुनील तटकरे यांनी सांगितले की, महायुती म्हणूनच लढणार. पण, त्या-त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठीच माझा दौरा आहे.